मुंबई - मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर हे सोमवारी त्यांच्याच मतदारसंघातील महिलेशी असभ्य वागले. त्यांच्या पदाला हे शोभण्यासारखं नसून ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे. त्यामुळे ते मुंबईचे महापौर आहेत की पहिल्या श्रेणीचे गुंड?, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी केला. नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यावर टीका केली.
महापौरांविरुद्ध ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल करा - चाकणकर
महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सांताक्रूझ येथे जाब विचारणाऱ्या महिलेचा हात पिरगळून तिला अपशब्द वापरल्याबद्दल तत्काळ त्यांच्याविरोधात ३५४ अंतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केली आहे.
सांताक्रूझ पूर्व या त्यांच्याच मतदारसंघात पाणी साचल्यामुळे शॉर्टसर्किट होऊन मायालेकींचा मृत्यू झाला. स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच महापौर म्हणून त्यांची जबाबदारी असतानाही त्यांनी कुठलीही कृती केली नाही, म्हणून संतापलेल्या महिलांनी त्यांना घेराव घालून जाब विचारला असता जाब विचारणा-या महिलेलाच महापौरांनी दमदाटी केली तसेच सर्वांसमोर तिचा हात पिरगळला. महौपारपदावर असलेल्या व्यक्तिला हे शोभत नाही. त्यामुळेच ज्या प्रमाणे एरव्ही पोलिस आंदोलकांवर किंवा अन्य प्रकारामध्ये सुमोटो दाखल करून कारवाई करतात, तशीच कारवाई कायद्यातील कलम ३५४ नुसार तत्काळ गुन्हा दाखल करावा. तसेच महापौरांनी त्यांचा पदाचा राजीनामाही द्यावा, अशी मागणी चाकणकर यांनी केली आहे.