मुंबई - काँग्रेसचे नगरसेवक विठ्ठल लोकरे यांनी सोमवारी महापौर विश्वनाथ महाडेश्वर व पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्याकडे राजीनामा सादर करून शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित मातोश्री येथे त्यांनी कार्यकर्त्यांसह शिवबंधन बांधले. लोकरे हे मानखुर्द प्रभाग क्रमांक १४१मधून काँग्रेसचे नगरसेवक म्हणून निवडून आले होते.
लोकरे यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर सोमवारी ते शिवबंधन हाती बांधणार हे निश्चित झाले होते. त्यानुसार महापौर व पालिका आयुक्तांकडे नगरसेवक पदाचा राजीनामा सादर करून लोकरे पक्ष प्रवेशासाठी मातोश्रीवर दाखल झाले. यावेळी त्यांच्या सोबत शिवसेनेचे सरचिटणीस मिलिंद नार्वेकर होते. लोकरे यांनी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सुनंदा लोकरे व कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत प्रवेश करून शिवबंधन बांधले.
विठ्ठल लोकरे हे नारायण राणे समर्थक होते. परंतु, राणे यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष काढल्यानंतर, ते शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांच्या संपर्कात होते. यापूर्वी राणे समर्थक सुरेश पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता.
लोकरे हे मानखुर्दच्या प्रभाग क्रमांक १४१ मधून काँग्रेसचे नगरसेवक म्हणून निवडून आले. ते पूर्वी सलग दोन वेळा या मतदार संघातून नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यानंतर प्रभाग महिला आरक्षित झाल्यानंतर त्यांची पत्नी सुनंदा लोकरे नगरसेवक म्हणून निवडून आल्या होत्या. मार्च २०१७ च्या सार्वत्रिक निवडणुकीत पुन्हा नगरसेवक म्हणून निवडून आले. नगरसेवक पदाची त्यांची ही तिसरी टर्म होती. ते सुधार समिती सदस्य त्यानंतर स्थायी समितीवर सदस्य होते. शनिवारी त्यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा पक्षाचे कार्यकारी मुंबई अध्यक्षांकडे सादर केला. विठ्ठल लोकरे हे पूर्वी शिवसेनेत होते. परंतु नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर विठ्ठल लोकरे हेही त्यांच्यासोबत गेले होते. परंतु आता राणे यांच्यासोबत गेलेले सर्व पुन्हा शिवसेनेत परतू लागले आहेत. यापूर्वी अनिल पाटणकर, सुरेश पाटील आणि त्यानंतर आता लोकरे हे स्वगृही परतले आहेत.