मुंबई - मुंबईत गणेशोत्सवादरम्यान होणारी गर्दीच्या पार्श्वभूमीवर गणेश भक्तांना आरोग्याची समस्या उद्भवल्यास त्यांना प्राथमिक उपचार देण्याचे प्रशिक्षण गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना दिले जाणार आहे.
मुंबईतील गणेशोत्सवात गणपतींची आरास, पाहण्यासाठी दिवसरात्र येत असतात. गणेशोत्सव मंडळेही अगदी उत्स्फूर्तपणे गणेशाच्या सेवेसाठी सज्ज होतात. अशा गर्दीच्या ठिकाणी भक्तांना आरोग्याची समस्या उद्भवल्यास गणेश मंडळातील स्वयंसेवकांना आरोग्य सेवेचे प्राथमिक धडे देण्याचा उपकम वोक्हार्ट हॉस्पिटलकडून सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमात मुंबईतील नामांकित गणेश मंडळांनी सहभाग घेतला आहे. आगमन मिरवणुका आणि दर्शन घेण्यासाठी विविध ठिकाणांहून भक्त गर्दी करतात. त्यामुळे वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती निर्माण होण्याची शक्यताही वाढते. त्यामुळे हे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
मुंबईतील गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा केला जातो. या उत्सवात परदेशी पाहुणेही सहभागी होतात. उत्सवाच्या दिवसात मंडळांची प्रचंड धावपळ सुरु असते. अशा ठिकाणी वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती निर्माण होण्याची शक्यताही वाढते. यासाठी मुंबईतील ५० हून अधिक गणेश मंडळांतील २५० स्वयंसेवकांना कार्डिओपल्मनरी रेसुसिटेशन (सीपीआर) आणि बेसिक लाइफ सपोर्ट (बीएलएस) याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी प्रथमोपचार साधनांचे वितरणही करण्यात आले असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.