मुंबई, दि. 10: राज्यातील पूरग्रस्त नागरिकांना दिलासा देण्याचे काम वैद्यकीय पथकांमार्फत करण्यात येत आहे. कोल्हापूर, सांगली भागात सुमारे 70 पेक्षा अधिक पथके तैनात करण्यात आली आहेत. पूरग्रस्तांना मदत करतानाचा संपूर्ण आरोग्य यंत्रणेच्या नियंत्रणासाठी आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: गेल्या चार दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात तळ ठोकून आहेत. कोल्हापूर, सांगली भागात सर्पदंशावरील लस, लेप्टोवरील गोळ्या आणि पाणी शुद्धीकरणासाठी 1 कोटी क्लोरीनच्या गोळ्यांचे वाटप केले जात आहे.
पुरग्रस्तभागात आरोग्यमंत्री शिंदे बुधवारपासून कोल्हापूर मुक्कामी आहेत. पूरग्रस्त भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याच्या कामात सहकार्य करतानाच त्यांना आवश्यक ती वैद्यकीय मदतदेखील केली जात आहे. राज्यातील अन्य भागात अतिवृष्टी आणि पूरपरिस्थिती आहे. तेथील नागरिकांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य सुविधेचाही आरोग्यमंत्री दैनंदिन आढावा घेत आहेत. राज्यभरात 325 वैद्यकीय पथके कार्यरत आहेत.
यासंदर्भात अधिक माहिती देताना आरोग्यमंत्री म्हणाले, राज्यातील अन्य भागापेक्षा कोल्हापूर, सांगली भागातील परिस्थिती बिकट आहे. या भागातील पाणी काहीसे कमी होण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे प्रशासनाचा भर स्वच्छता मोहीम आणि साथीच्या आजारांचा फैलाव होऊ नये यावर आहे.
आरोग्य विभागामार्फत या दोन्ही जिल्ह्यांमध्ये 70 पेक्षा अधिक वैद्यकीय पथके कार्यरत केली आहेत. शिवाय रविवारी मुंबईहून 100 डॉक्टरांचे पथक, औषधांसह या दोन जिल्ह्यांमध्ये दाखल होणार आहे. पुराच्या पाण्यामुळे सांगली आणि कोल्हापूर भागात मानवी वस्तीत साप शिरल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सर्पदंशावरील लसीचा मोठ्या प्रमाणात पुरवठा करण्यात आला आहे. कोल्हापूरमध्ये 12 हजार तर सांगलीमध्ये 5 हजार लसींचा पुरवठा करण्यात आला आहे.
पुराच्या पाण्यामुळे होणारा लेप्टोचा संभाव्य धोका ओळखून त्याच्यावरील उपचाराच्या गोळ्यांचे वाटप करण्यात आले असून सांगलीमध्ये 8 लाख आणि कोल्हापूरमध्ये 12 लाख डॉक्सिसायक्लिन गोळ्या देण्यात आल्या आहेत. 30 लाख गोळ्या राखीव ठेवण्यात आल्या आहेत. साथरोगांचा उद्रेक होऊ नये यासाठी संनियंत्रण केले जात आहे.पूरग्रस्त भागात पिण्याचे पाणी शुद्धीकरणासाठी एक कोटी क्लोरीनच्या गोळ्यांचे वाटप करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.