सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी खासदार फंडातून 25 लाखांची मदत - आठवले - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 August 2019

सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी खासदार फंडातून 25 लाखांची मदत - आठवले


सांगली, दि. 12 : मोठ्या प्रमाणावर झालेल्या पावसामुळे सांगली जिल्ह्यात आलेल्या पूराने लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पूरग्रस्तांच्या पाठिशी शासन खंबीरपणे आहे. या आपत्तीमध्ये नुकसान झालेल्या सर्व लोकांना न्याय देण्याची भूमिका केंद्र व राज्य शासनाची असल्याचे सांगून खासदार फंडातून सांगली व कोल्हापूर जिल्ह्यासाठी प्रति जिल्हा 25 लाख रूपये मदत देणार असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घोषित केले.

पलूस तालुक्यातील वसगडे, मिरज तालुक्यातील नांद्रे येथे स्थलांतरितांच्या तात्पुरत्या निवारा केंद्रांना भेट देवून आठवले यांनी तेथील पूरग्रस्तांना दिलासा दिला. यावेळी त्यांच्यासोबत अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ सरोदे, जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी राधाकिसन देवढे आदि उपस्थित होते.

पूरबाधितांना कायमस्वरूपी निवारा होईपर्यंत तात्पुरती घरे देण्यात येतील, असे सांगून आठवले म्हणाले, पूराचा सामना करण्यासाठी सुरक्षितस्थळी घरे बांधता येतील असा आराखडा तयार करण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना देण्यात येतील. शासन निकषाप्रमाणे देय असणारी रक्कम सर्व पूरग्रस्तापर्यंत व्यवस्थित पोहचतील याबाबत दक्षता घेण्यात येईल असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी ब्रम्हनाळ येथे बोट उलटून झालेली घटना दुर्दैवी असून पुन्हा अशी घटना होणार नाही यासाठी दक्षता घेण्यात येईल असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी ब्रम्हनाळ दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रदांजली वाहिली.

Post Bottom Ad