दहिहंडी उत्सवावर पूरस्थितीचे विरजण - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 August 2019

दहिहंडी उत्सवावर पूरस्थितीचे विरजण


मुंबई - कोकण, कोल्हापूर, सांगली, ठाणे, बदलापूराला पुराचा तडाखा बसला. आयोजकांनी त्यामुळे यंदा माघार घेत हंड्या रद्द केल्याने दहीहंडीच्या उत्सवाच्या आनंदावर विरजण पडले आहे. गोविंदा रे गोपाळा, ढाक्कूमाक्कूम आदी दहिहंडीच्या गाण्यावर आणि डीजेच्या दणदणाटात थिकरणाऱ्या मुंबईकरांचा उत्साह मावळण्याची स्थिती आहे.

जन्माष्टमी हा सण राज्यातील लोकप्रिय सणांपैकी एक. दहीहंडी, पाण्याचा धारा आणि डीजेवरील गाणी याचा आनंद लुटण्याकरिता तरुण वर्ग या सणाची आतुरतेने वाट बघत असतो. सांगली, कोल्हापूर, चिपळूण, सिंधुदुर्ग आदी भागांना पुराचा फटका बसल्याने येथील जनजीवन विस्कळीत झाले. राज्यातील पूराचे भान राखत मुंबईतील दहीहंडी उत्सवातील काही आयोजकांनी दहीहंडीचे आयोजन रद्द केले आहेत. हा निर्णय गोविंदा पथकांच्या पथ्यावर पडला आहे. संकटात सापडलेल्या पूरग्रस्तांना मदत पोहोचवणे गरजेचे असल्याने बहुतांशी गोविंदा पथके जीवनावश्यक वस्तू गोळा करण्याच्या कामात व्यस्त आहेत. अनेक गोविंदांच्या घरांत पाणी शिरल्याने तेही आपला विस्कटलेला संसार सावरण्याचा प्रयत्न करीत आहेत. मुंबईतील दहिहंडी उत्सवात यंदा पहिल्यासारखा उत्साह राहिलेला दिसून येत नाही. बहुतांश मंडळांनी सरावच केला नसल्याची स्थिती आहे. तर राजकीय मंडळींकडून गोविंदाचा विमा उतरवला गेला आहे. परंतु, हंड्या रद्द करण्यात आल्याने गोविंदा हिरमुसले आहेत. पूरग्रस्तांचे भान राखून उत्सव साधेपणाने साजरा करा, भले बक्षीसांची रक्कम कमी असली तरी चालेल, असे आवाहन गोविंदा पथकांकडून केले जात आहे. त्यात हंडीची उंची व गोविंदांच्या वयोमर्यादेवरील अटींचे पोलिसांकडून कठोर अंमलबजावणी केली जाणार आहे. गोविंदा पथकांकडून आणि आयोजकांकडून बालगोविंदांना थरांमध्ये सहभागी करून घेतल्यास थेट नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे. मागील वर्षी बालगोविंदांच्या पालकांना समज देऊन सोडण्यात होते. मात्र, यंदा पोलिसांनी कायद्यावर बोट ठेवल्याने पथकांमध्ये नाराजीचे सुरु उमटत आहेत.

Post Bottom Ad