कोलंबोः जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवणे आणि स्वतंत्र लडाखची निर्मिती या केंद्र सरकारच्या निर्णयाचे श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी स्वागत केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने कलम ३७० हटवणे आणि जम्मू काश्मीरचे विभाजन करून लडाखला केंद्र शासित प्रदेश करण्याचा निर्णय घेतल्यानंतर श्रीलंकेचे पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी ट्विटरवरून आपले मत व्यक्त केले. लडाखची निर्मिती आणि जम्मू काश्मीर राज्याची पुनर्रचना हा भारताचा अंतर्गत प्रश्न आहे. मात्र, यामुळे लडाखला केंद्र शासित प्रदेशाचा दर्जा मिळाला आहे. लडाखमध्ये ७० टक्के नागरिक बौद्ध धर्मीय आहेत. त्यामुळे बौद्ध बहुल जनता असलेले लडाख भारताचा पहिले राज्य ठरेल, असे विक्रमसिंघे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. मी लडाखला भेट दिली आहे. लडाखमधील अनुभव खरोखरच अद्भूत होता, असे विक्रमसिंघे यांनी नमूद केले. दरम्यान, श्रीलंका हा बौद्ध बहुल जनता असलेला देश आहे. श्रीलंकेतील बौद्ध धर्मीय जनतेची संख्या ७४ टक्के आहे.