मुंबई - राज्यभरातील महिलांनी भारतीय जनता पार्टी, महिला मोर्चाच्या माध्यमातून आपल्यासाठी विक्रमी 25 लाख राख्या पाठवून आपल्यावर विश्वास व्यक्त केला असून विश्वासाचा या बळावर आपण राज्यातील सर्व माता भगिनींपर्यंत आणि शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहचवू आणि त्यांना न्याय मिळवून देऊ,असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मुंबईत केले.
भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चा आघाडीतर्फे आयोजीत शक्ती सन्मान महोत्सव मंगळवारी षण्मुखानंद सभागृहात पार पडला. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, भाजपा महिला मोर्चा राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर, महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे, महिला व बाल कल्याण राज्यमंत्री विद्या ठाकूर, संघटनमंत्री विजयराव पुराणिक, भाजपा प्रदेश सरचिटणीस आ. अतुल भातखळकर, प्रदेश सचिव व महिला मोर्चाच्या प्रभारी उमाताई खापरे, प्रदेश महिला मोर्चा अध्यक्षा ॲड. माधवी नाईक, मुंबई भाजपा अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, आ. सरदार तारासिंग, आ. कॅप्टन तमीळ सेल्वन, आ. प्रसाद लाड, प्रदेश कोषाध्यक्ष शायना एन.सी., भाजपा महिला मोर्चा सरचिटणीस अर्चना डेहणकर आणि आरती पूगावकर, मुंबई महिला मोर्चा अध्यक्षा शलाका साळवी तसेच या अभियानाच्या प्रमुख निलम गोंधळी उपस्थित होत्या.
या मोहिमेच्या माध्यमातून राज्यभरातून २५ लाखाहून अधिक राख्या गोळा करण्यात आल्या आहेत. या अभियानाची दखल गोल्डन बूक ऑफ रेकॉर्डने घेतली असून संस्थेचे अध्यक्ष मनिष विष्णोई यांनी प्रमाणपत्र दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्त्री शक्ती ओळखून त्यांना अधिक सक्षम करण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या. घरातल्या स्त्रीचे आरोग्य जपण्यासाठी उज्वला योजना सुरू केली. महिला उद्योजिकांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष औद्योगीक धोरण सुरू करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. यासाठी खास ३० टक्के जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तर त्यांच्या प्रशिक्षणासाठी २०० कोटी रूपयाची तरतूद करण्यात आली आहे. पाच वर्षापूर्वी फक्त ३ लाख कुटुंबातील महिला बचत गटाशी जोडलेल्या होत्या. महिला व बाल कल्याणमंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली आज ४० लाख कुटूंबातील महिला बचत गटाच्या माध्यमातून आपल्या कुटूंबांच्या विकासासाठी हातभार लावत आहेत. विधवा, परित्यक्त्या महिला स्वावलंबी व्हाव्यात यासाठी ही खास योजना सुरू करण्यात आल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने तिहेरी तलाक संबंधित कायदा करून मुस्लीम महिलांचे संरक्षण केले आहे. स्त्रियांच्या, तरूणींच्या संरक्षणासाठी निर्भया योजना सुरू करून समाजात सुरक्षीत वातावरण निर्माण केले आहे, असे ते म्हणाले.
चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, शक्ती सन्मान अभियानामुळे महिला मोर्चाने पक्षाची विचारसरणी आणि सरकारची कामे, योजना ही घराघरांपर्यंत पोहचवली आहेत. भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांना अनन्य साधारण महत्त्व आहे. महिलांना स्वातंत्र्यानंतरही दुय्यम स्थान दिले गेले. केंद्रात मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली स्त्री सक्षमीकरणाचे अनेक योजना सुरू करून त्यांना सक्षम करण्यावर अधिक भर दिला जात आहे.
पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, भाजपा हा केवळ पक्ष नसून परिवार, संस्कृती आणि संस्कार आहे. आज भाजपाची प्रत्येक महिला ही मुख्यमंत्र्यांची बहीण होत आहे ही आनंदाची गोष्ट आहे. विजया रहाटकर म्हणाल्या की, बहिणीची खरी ताकद ही आजच्या कार्यक्रमात दिसत आहे. महिला केवळ हळदी-कुकूंवाचे कार्यक्रम करीत नाही तर सरकारच्या योजना गरजूंपर्यंत पोहचविण्याचे काम करतात. त्यामुळे महिला शक्ती ही निवडणूकीच्या माध्यमातूनही दिसते. ॲड. माधवी नाईक म्हणाल्या की, शक्ती सन्मान अभियानाच्या माध्यमातून महिला मोर्चाने सरकारच्या अनेक लाभार्थी महिलांशी संपर्क साधला आहे. या सरकारची कामे व योजना घराघरांपर्यंत पोहचविल्या असून पक्षाचे विचारही पोहचविला आहे.
या कार्यक्रमात महिलांनी मुख्यमंत्र्यांसाठी राखी पाठवतानाच राज्यातल्या पूरग्रस्त भागांसाठीही आर्थिक मदत गोळा करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या हाती सुपुर्द केली.