मुंबई - संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सहलीसाठी आलेल्या ग्रुपमधील एका तरुणाचा येथील एका धबधब्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. अजय खरटमोल असं या १९ वर्षीय तरुणाचं नाव आहे. अजय हा अक्षय कटके, मनिष चंद्रमोरे, जय सरोदे आणि ऋषभ सरोदे या मित्रांसह संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सहलीसाठी आला होता. हे पाचही जण नॅशनल पार्कमधील भारतीय हवाई दलाच्या सेंटरमागील धबधब्यावर पोहोण्यासाठी गेले होते. मात्र, धबधब्याच्या खोल पाण्याचा अंदाज न आल्याने अजयचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. आपत्ती व्यवस्थापन पथकाचे जवान आणि ठाणे अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन त्याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. हे पाचही जण ठाण्याच्या लोकनान्य नगर पाडा नंबर ३मधील राहणारे असल्याने अजयचा मृतदेह वर्तक नगर पोलिसांकडे सोपविण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहेत.