पावसाच्या पाणीसाठ्याचे आतापासूनच नियोजन करा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 August 2019

पावसाच्या पाणीसाठ्याचे आतापासूनच नियोजन करा


मुंबई : पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे, अशा परिस्थितीत मुंबईकर नागरिकांना पाणीटंचाईला तोंड देण्याची पाळी येऊ नये, यासाठी प्रशासनाने आतापासूनच पाणीसाठ्याचे नियोजन करावे, असे निर्देश महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी पालिका प्रशासनाला दिले.

मुंबईकरांना गेल्या काही वर्षांपासून पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. यंदाही सुमारे आठ महिने पाणीकपातीचा सामना मुंबईकरांना करावा लागला. पावसाच्या पाण्याचे नियोजन केले, तर भविष्यात पाणीटंचाईचे संकट मुंबईकरांना भेडसावणार नाही. यासाठी पालिकेने पाणी नियोजन करण्याचा प्रस्ताव सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी मांडला. त्यावर सर्वपक्षीय नगरसेवकांनी मत मांडल्यानंतर महापौरांनी प्रशासनाला निर्देश दिले. पालिका प्रशासनास आणि सरकारला पाण्याचे नियोजन करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. मागील वर्षी पाऊस कमी झाल्याने धरणे भरली नाहीत. त्यामुळे पालिकेने १० टक्के पाणीकपात करून नियोजन केले. मात्र, यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने यंदा मुंबईकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नसल्याचे तज्ज्ञांचे मत असले तरी पालिकेने पावसाच्या पाणीसाठ्याचे नियोजन करून भविष्यात येणाऱ्या संकटांचा आताच सामना करण्यासाठी तयारी करावी, असा मतप्रवाह आहे. त्याचे पडसाद बुधवारी पालिकेच्या महासभेत उमटले. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव म्हणाले की, मुंबईत पावसाचे प्रमाण वाढत आहे ही समाधानाची बाब आहे. परंतु पावासाच्या पाण्याची साठवणूक झाली पाहिजे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा पुरेसा असला तरी अनेक उपाय योजून पावसाचे पाणी साठवणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. पालिका प्रशासन त्यासाठी वेगवेगळी उपाययोजना करील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

विरोधी पक्षनेते रविराजा म्हणाले की, पावसाच्या पाणीसाठ्यासाठी प्रत्येक इमारतीत रेनवॉटर हार्वेस्टिंग गरजेचे होते; परंतु प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने मुंबईकरांना या त्रासातून जावे लागत आहे. विकासकांनी रेनवॉटर हार्वेस्टिंग करण्याचे मान्य केल्यानंतर त्यांना परवानग्या देण्यात आल्या; पण त्यांनी दिलेला शब्द पाळला नाही. परिणामी, पालिकेचे आणि मुंबईकरांचे त्यामुळे नुकसान झाले आहे. रेनवॉटर हार्वेस्टिंगच्या अटीशिवाय पालिकेने विकासकांना बांधकामासाठी परवानगी देऊ नये, अशी सूचना त्यांनी केली. आपण निष्काळजीपणाने वागलो तर पाण्यासाठी युद्ध करावे लागेल. त्यामुळे विहिरी वाचवा, बोअरवेल दुरुस्त करा आणि त्या पाण्याचा वापर नियोजनबद्ध करावा, असे मत अश्रफ आजमी यांनी मांडले. दूषित पाणी शुद्ध करण्यासाठी पालिकेकडे निधी नसावा ही मोठी शोकांतिका असल्याचे ते म्हणाले.

Post Bottom Ad