मुंबई- स्वातंत्र दिनापूर्वी महापालिका शालांमधील विद्यार्थ्यांना शालेय गणवेश देण्यात येईल असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले मात्र वेळेत गणवेश न मिळाल्याने विद्यार्थी जुन्याच गणवेशात शाळेत दाखल झाले. त्यामुळे दिंरगाई करणार्या ठेकेदारांवर दंडात्मक कारवाईला महापालिकेने सुरुवात केली आहे.
महापालिकेच्या 1 हजार 38 प्राथमिक, तर 149 माध्यमिक शाळा आहेत. त्यामध्ये 2 लाख 96 हजार 815 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळांत शिकणार्या मुलांना पालिका 27 शैक्षणिक साहित्य वितरण करते. पालिकेकडून त्यासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयाची तरतूद केली जाते. मागील तीन वर्षापासून या वस्तू पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना मिळाल्या होत्या. यंदा 15 ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना 27 वस्तू मिळतील असा दावा पालिकेने केला होता. टेक्नोग्राफ असोसिएशन कंत्राटदाराला गणवेश आणि पारसमल पधारिया या कंत्राटदाराला बॅग पुरवण्याचे कंत्राट दिले होते. 14 ऑगस्टपर्यंत वस्तू आणि गणवेश पुरविण्याचे निर्देश ठेकेदारांना दिले होते. परंतु ठेकेदारांनी 14 ऑगस्टपर्यंत फक्त 50 टक्के शाळांत शालेय वस्तू व गणवेशाचा पुरवठा केला. तर उर्वरित विद्यार्थ्यांना अद्याप वस्तू पुरवठा केलेला नाही. त्यामुळे पालिकेने वस्तू पुरवठा करणार्या ठेकेदारांवर कारवाईला सुरुवात केली आहे. त्यानुसार एक आठवडा विलंब केल्यास 0.5 टक्के असा दंड, त्यापुढेही वस्तू उशीर झाल्यास 1 टक्के दंड आकारला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.