मुंबई - महाराष्ट्र शासनाने दिनांक १० मार्च, २०१९ रोजी जारी केलेल्या अध्यादेशान्वये ५०० चौरस फुटापर्यंतच्या निवासी मालमत्तांवर मालमत्ता करातील सर्वसाधारण कराची आकारणी न करता सन २०१९-२० या वर्षासाठीची देयके करदात्यांना पाठविण्याची कार्यवाही बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे सुरु केलेली आहे. त्यानुसार करदेयके लवकरच करदात्यांना प्राप्त होतील.
बृहन्मुंबई महानगरपालिकेचा मालमत्ता कर तत्परतेने भरणाऱया करदात्यांसाठी महानगरपालिकेने सन २०१९-२० साठीच्या देयकांकरीता ‘अर्ली बर्ड इन्सेंटिव्ह’ प्रोत्साहनपर योजना यावर्षीदेखील जाहीर केली आहे. अद्याप, ज्या करदात्यांना मालमत्ता कराची देयके मिळालेली नाहीत, अशा करदात्यांनादेखील वरील योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. त्यासाठी यापूर्वी जाहीर केलेल्या‘अर्ली बर्ड इन्सेंटिव्ह योजना’ चा कालावधी सुमारे ३ महिन्यांसाठी वाढविण्यात आला असल्याचे महापालिका प्रशासनाने कळविले आहे.