नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाला आगामी जानेवारीपर्यंत नवा राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कमीत कमी ५० टक्के राज्ये आणि कंेद्रशासित प्रदेशांत संघटनात्मक निवडणुका पार पडल्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष निवडीची प्रक्रिया पार पडण्यासाठी एक महिन्याचा वेळ लागेल..
दिल्लीच्या पक्ष मुख्यालयात नुकतेच पक्षाचे वरिष्ठ नेते राधामोहन सिंह यांच्या अध्यक्षतेखाली राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील निवडणूक प्रभारी आणि सहप्रभारींची बैठक झाली. या बैठकीत पक्षाच्या संघटनात्मक निवडणुकीवर चर्चा करण्यात आली. या बैठकीत भाजपा कार्यकारी अध्यक्ष जे.पी. नड्डा, संघटन महासचिव बी.एल. संतोष, माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर, खासदार विनोद सोनकर आणि कर्नाटक आमदार सी.टी. रवी आदींची उपस्थिती होती. या बैठकीनंतर बोलताना सिंह म्हणाले की,२० ऑगस्ट रोजी सदस्यता अभियान समाप्त झाल्यानंतर ११ सप्टेंबरपासून संघटनात्मक निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे. बुथ स्तरावरच्या निवडणुका ३० सप्टेंबरला पूर्ण होतील. यानंतर मंडळाच्या निवडणुका होतील. ३० नोव्हेंबरपर्यंत जिल्हाध्यक्ष आणि १५ डिसेंबरपर्यंत राज्याच्या अध्यक्षाची निवडणूक होईल. यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू होईल.