मुंबई: बेस्ट कामगारांच्या वेतन कराराचा प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेली मध्यस्थी अयशस्वी ठरल्यानंतर बेस्ट कामगारांनी आजपासून बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. तर सातव्या वेतन आयोगाचा प्रश्न निकाली निघाला असून दोन दिवसात अंतिम करार करण्यात येणार असल्याचा दावा बेस्ट कामगार सेनेनं केला आहे.
महाराष्ट्र शासन आणि मुंबई महापालिकेच्या धर्तीवर बेस्ट कामगारांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी तातडीने लागू कराव्यात, बेस्टचा अर्थसंकल्प महापालिकेच्या अर्थसंकल्पात विलिन करावा तसेच महापालिका आणि बेस्ट कामगारांना देण्यात येणाऱ्या सानुग्रह अनुदानाच्या रकमेत तफावत करू नये या तीन प्रमुख मागण्यांसाठी बेस्ट संयुक्त कृती समितीने वडाळा डेपो येथे बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. बेस्ट वर्कस युनियनचे सरचिटणीस शशांक रावही या उपोषणात सहभागी झाले आहेत. आजपासून बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. सरकारने आमचा अंत पाहू नये. वेळ आल्यास कामगारांनी दिलेला संपाचा कौलही वापरू, असा इशारा देतानाच शिवसेना संप फोडण्याचे प्रयत्न करत असल्याचा आरोप शशांक राव यांनी केला आहे. दरम्यान, बेस्ट कामगारांनी आंदोलन करू नये म्हणून शिवसेना सचिव, आमदार अनिल परब आणि बेस्ट कामगार सेनेचे नेते सुहास सामंत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मात्र त्यात काहीच तोडगा निघाला नाही. तर शशांक राव यांनी बेस्ट समितीच्या अध्यक्षांसोबत आणि बेस्टच्या महाव्यवस्थापकांसोबत चर्चा करूनही तोडगा न निघाल्यानं राव यांनी बेमुदत उपोषण सुरू करत असल्याचं जाहीर केलं.