मुंबई - बेस्ट कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी आज मध्यरात्रीपासून पुकारण्यात आलेला बेस्टचा संप तूर्तास २० ऑगस्टपर्यंत स्थगित करण्यात आला आहे. बेस्ट कर्मचारी मेळाव्यात याचा निर्णय घेण्यात आला आहे. आजच्या बैठकीत झालेल्या वाटाघाटीत सकारात्मक चर्चा झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती बेस्ट युनियनचे नेते शशांक राव यांनी दिली.
निवृत्त कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युईटी, वेतन करार संपल्यानं पुन्हा करार करणे, घरांचा प्रश्न आणि सामंजस्य करार आदी प्रलंबित मागण्या मान्य करण्यासाठी बेस्टने या संपाचा इशारा दिला होता. जानेवारी महिन्यात काही कामगार संघटनांनी जवळपास ९ दिवस संप केला होता. त्यामुळे मुंबईकरांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागले होते. त्यावेळी प्रशासनानं कर्मचाऱ्यांना आश्वासने दिली होती. ती अद्याप पूर्ण होऊ शकली नाही. ती आश्वासने पूर्ण व्हावीत यासाठी संपाचा इशारा देण्यात आला होता.