मुंबई : बेस्ट कर्मचाऱ्यांना गेल्या दिवाळी सणानिमित्त ५ हजार ५०० रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले होते. दहा महिने उलटून गेल्यानंतरही कर्मचाऱ्यांना ते देण्यात आले नाही. भाजपाचे सदस्य सुनील गणाचार्य यांनी या संदर्भात मांडलेल्या तहकुबी सूचनेला शिवसेनेसह काँग्रेसच्या सर्व सदस्यांनी पाठिंबा दिला. परिणामी, शुक्रवारी बेस्ट समितीची सभा तहकूब करण्यात आली.
बेस्टच्या महाव्यवस्थापकांनी २ नोव्हेंबर २०१८ रोजी झालेल्या बेस्ट समितीच्या सभेत कर्मचाऱ्यांना दिवाळी सणानिमित्त सानुग्रह अनुदान म्हणून ५५०० रुपये देण्याचे जाहीर केले होते. बेस्टची आर्थिक स्थिती खालावली असतानाही महाव्यवस्थापकांनी कामगारांबाबत दाखवलेल्या सहानुभूतीचे त्या वेळी सर्व समिती सदस्यांनी स्वागत करत अभिनंदनही केले होते. याला १० महिने झाले तरी अद्याप ती रक्कम कामगारांना मिळाली नाही. आता गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यानिमित्त तरी सानुग्रहाची रक्कम कामगारांना देण्यात यावी, म्हणजे त्यांना सण आनंदात साजरा करण्यात येईल, अशी मागणी सुनील गणाचार्य यांनी केली.
बेस्टला अनेक कामांसाठी महापालिकेकडून आर्थिक मदत मिळाली आहे. महापालिका १२०० कोटी रुपये देणार आहेत. त्यापैकी ९६१ कोटी बेस्टला मिळालेले आहेत. त्यातून २२ कोटी रुपये कामगारांना देता आले असते किंवा सानुग्रह अनुदानासाठी पाठपुरावा केला असता, तर तेही मिळाले असते. मात्र, सानुग्रह अनुदान देण्याबाबत बेस्ट प्रशासन उदासीन आहे. त्याच्या निषेधार्थ बेस्ट समितीची सभा तहकूब करण्यात यावी, अशी मागणी गणाचार्य यांनी केली.
बेस्टचे माजी अध्यक्ष आणि शिवसेनेचे सदस्य अनिल कोकीळ आणि आशीष चेंबूरकर तसेच भाजपाचे श्रीकांत कवठणकर, काँग्रेसचे भूषण पाटील यांनीही गणाचार्य यांच्या ठरावाच्या सूचनेला पाठिंबा दिला. महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे यांनी दिलेला शब्द का पाळला नाही, असा प्रश्न अनिल कोकीळ यांनी केला, तर आशीष चेंबूरकर यांनी विकासकाकडून येणे असलेले २०० कोटी वसूल करा; पण बेस्टच्या कामगारांचे सणासुदीचे पैसे द्या, अशी मागणी केली.
दिवाळी सणानिमित्त २०१७ मध्ये दिलेल्या ५ हजार ५०० रुपयांचे सानुग्रह अनुदान प्रशासनाने दरमहा पाचशे रुपयांप्रमाणे पगारातून कापून घेतले. तर २०१८ मध्ये घोषित केलेले ५५०० रुपये अद्याप दिलेच नाही. ही बेस्ट कामगारांची चेष्टा आणि फसवणूक असल्याचे सांगत कोकीळ आणि चेंबूरकर यांनी बेस्ट प्रशासनाचा निषेध केला.