अंगणवाडी सेविकांचा तीव्र आंदोलनाचा इशारा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

13 August 2019

अंगणवाडी सेविकांचा तीव्र आंदोलनाचा इशारा


मुंबई - आज आझाद मैदानावर अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी बॅरिकेड तोडून केलेल्या तीव्र आंदोलनानंतर पोलिसांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना जेलभरो आंदोलन न करण्याचे आवाहन केले व धावपळ करून माननीय अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची शिष्टमंडळाशी भेट घडवून आणली. दरम्यान याबाबत उद्या तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या राज्य महासचिव शुभा शमीम यांनी दिला आहे.

शिष्टमंडळाने माननीय अर्थमंत्र्यांशी पश्चिम महाराष्ट्रातील पूर व मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर २ महिने मानधन रखडल्याने अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे होणारे हाल तसेच जवळपास वर्ष होऊनही मोदींनी जाहीर केलेली मानधनवाढ महाराष्ट्रात अंमलात न आल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झालेला संताप याबाबत चर्चा केली. यावर माननीय अर्थमंत्र्यांनी शिष्टमंडळाला सांगितले की नियमित मानधन देण्यासाठी आवश्यक असलेला निधी खात्याला उपलब्ध करून देण्यात आला आहे व लवकरच थकित मानधन कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होईल.

मानधनवाढीबाबत त्यांनी सांगितले की त्यांनी या अगोदरच मानधनवाढीच्या प्रस्तावावर सह्या केल्या आहेत परंतु महिला व बालविकास खात्याने पाठपुरावा करण्याची गरज आहे. मुख्यमंत्री महोदयांनी सही केल्यावर शासकीय आदेश जारी केला गेल्यावर मानधनवाढ अंमलात येईल असे सांगितल्याचे शमीम यांनी सांगितले.

विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्यामुळे लवकरच आचारसंहिता लागू होईल. त्यापूर्वी ही प्रक्रिया त्वरित पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यामुळे कृती समितीला आपले आंदोलन सुरूच ठेवावे लागणार आहे. उद्या १४ ऑगस्ट रोजी पुणे, अमरावती या जिल्ह्यांमध्ये जेलभरो आंदोलन केले जाणार आहे. १५ ऑगस्टपर्यंत मानधनवाढीचा आदेश न आल्यास लवकरच कृती समितीची बैठक घेऊन पुढील कृती कार्यक्रम जाहीर केला जाईल. महाराष्ट्रातील जवळपास ४०,००० अंगणवाडी कर्मचारी जेलभरो आंदोलनासाठी रस्त्यावर उतरून देखील सरकार काहीच हालचाल करत नसल्याने कर्मचाऱ्यांनी उद्या तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिल्याचे शमीम यांनी सांगितले. 

Post Bottom Ad