आदिवासी भागात चार दिवसात 2000 शस्त्रक्रिया - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

31 August 2019

आदिवासी भागात चार दिवसात 2000 शस्त्रक्रिया



मुंबई, दि. 31 : राज्यात आरोग्य विभागामार्फत घेण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून 16 जिल्ह्यांमध्ये केवळ चार दिवसांत सुमारे 60 हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली, तर सुमारे 2 हजार शस्त्रक्रिया करण्यात आल्या. गरजू व गरीब रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आल्याने त्यांना या महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून दिलासा देण्यात आला आहे. सुमारे 1 हजाराहून अधिक शासकीय, खासगी डॉक्टर आणि विशेषज्ज्ञांनी सहभाग घेऊन रुग्णांची तपासणी व शस्त्रक्रिया केल्या. नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक 9100 रुग्णांची तपासणी करतानाच गडचिरोली जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक 325 शस्त्रक्रिया करण्यात आल्या.

‘संकल्प निरोगी महाराष्ट्राचा’ हे ब्रीद घेऊन राज्यातील पालघर, ठाणे, रायगड, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड, अमरावती, यवतमाळ, नाशिक, नंदुरबार, जळगाव, धुळे, पुणे आणि अहमदनगर या 16 जिल्ह्यांमध्ये 26 ते 29 ऑगस्ट दरम्यान महा‍शिबराचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा राज्यस्तरी शुभारंभ ठाणे येथून करण्यात आला होता.

त्यामध्ये आरोग्य तपासणी, मोफत चाचण्या, मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या. आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून दंत, कान, नाक, घसा, त्वचा या विशेषज्ज्ञांनी रुग्णांची तपासणी करतानाच एमबीबीएस, बीएएमएस, आयुर्वेदिक, होमिओपॅथी, युनानी अशा सुमारे हजाराहुन अधिक डॉक्टरांनी महाशिबिरात तपासणी केली.

अमरावती जिल्ह्यामध्ये सुमारे 5 हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली तर 152 जणांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. नांदेडमध्ये 4 हजार रुग्णांची तपासणी आणि 275 शस्त्रक्रिया करण्यात आल्या. याच पद्धतीने धुळे जिल्ह्यात 1600 रुग्णांची तपासणी आणि 50 जणांवर शस्त्रक्रिया झाली. नागपूर जिल्ह्यात 2200 रुग्णांची तपासणी करुन सुमारे 90 रुग्णांवर शस्त्रक्रिया झाली. नंदुरबार येथे 1500 रुग्णांची तपासणी तर 70 शस्त्रक्रिया झाल्या. पालघरमध्ये 4 हजार रुग्ण तपासणी आणि 200 शस्त्रक्रिया, यवतमाळ येथे 4 हजार 100 रुग्ण तपासणी आणि 50 शस्त्रकिया, जळगाव येथे 950 रुग्ण तपासणी तर 60 शस्त्रक्रिया, गडचिरोली येथे 3800 रुग्ण तपासणी तर 325 शस्त्रक्रिया, चंद्रपूर येथे 2700 रुग्ण तपासणी तर 75 शस्त्रक्रिया, ठाणे येथे 5540 रुग्ण तपासणी आणि 125 शस्त्रक्रिया, गोंदिया येथे 4220 रुग्ण तपासणी आणि 40 शस्त्रक्रिया, रायगड येथे 7325 रुग्ण तपासणी आणि 105 शस्त्रक्रिया, पुणे येथे 1600 रुग्ण तपासणी आणि 225 शस्त्रकिया करण्यात आल्या. अहमदनगर येथे 2100 रुग्ण तपासणी तर 80 शस्त्रक्रिया झाल्या. आणि नाशिक येथे 9100 रुग्ण तपासणी आणि 25 शस्त्रक्रिया करण्यात आल्या.

महाआरोग्य शिबिरातून शेवटच्या घटकातील नागरिकांना दिलासा-आरोग्य मंत्री
आदिवासी भागातील शेवटच्या घटकातील गरजू रुग्णापर्यंत आरोग्य सेवा मिळावी या हेतूने या शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. सर्व रुग्णांची मोफत तपासणी करतानाच आवश्यक त्या वैद्यकीय चाचण्या आणि गरजेनुसार शस्त्रक्रिया देखील मोफत करण्यात आल्याचे आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. या शिबिरांमध्ये 14 विविध प्रकारच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून तपासणी करण्यात आल्या. त्याचा आदिवासी भागातील जनतेला लाभ झाल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. आजाराच्या उपचारासोबतच आजार होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेवर विभागाने भर दिला असून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

Post Bottom Ad