मुंबई - ठाकरे कुटुंबातील सदस्यांनी पर्यंत कधीही कोणतीही निवडणूक लढवली नव्हती. मात्र बाळासाहेब ठाकरे यांच्या तिसऱ्या पिढीने निवडणूक रिंगणात उतरण्याचे निश्चित केले आहे. युवा सेनाप्रमुख असलेले आदित्य ठाकरे वरळीमधून निवडणूक लढवणार हे आता स्पष्ट झाले आहे. शिवसैनिकांना त्या दृष्टीने तयारीला लागण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
वरळी विधानसभेतील शिवसैनिकांचा एक मेळावा नुकताच पार पडला. विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा या मेळाव्यात घेण्यात आला. शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी यावेळी शिवसैनिकांना मार्गदर्शन केलं. त्याचवेळी त्यांनी आदित्य ठाकरे वरळीतून निवडणूक लढणार असल्याची घोषणा केल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. शिवसैनिकांच्या या मेळाव्याला वरळीतील विद्यमान आमदार सुनील शिंदे व राष्ट्रवादी काँग्रेसमधून नुकतेच शिवसेनेत आलेले माजी आमदार सचिन अहिर हे देखील उपस्थित होते. या दोघांनीही परब यांच्या घोषणेचं स्वागत केल्याचंही समजतं. वरळी हा मतदारसंघ शिवसेनेसाठी अत्यंत सुरक्षित मानला जातो. मागील निवडणुकीत सुनील शिंदे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार अहिर यांचा दणदणीत पराभव केला होता. आता अहिर स्वत: शिवसेनेत आले आहेत. त्यामुळं येथील निवडणूक शिवसेनेच्या दृष्टीनं एकतर्फी ठरेल, असा शिवसैनिकांचा होरा आहे.