'ई पॉस' मशीन धान्य वितरणामुळे ३.६४ मेट्रिक टन धान्याची बचत - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 August 2019

'ई पॉस' मशीन धान्य वितरणामुळे ३.६४ मेट्रिक टन धान्याची बचत

मुंबई, दि. 31 : सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत करण्यात येणारे धान्य वितरण हा सर्व सामान्य नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. धान्य वितरण योग्य लाभार्थ्यांनाच व्हावे यासाठी सर्व रास्तभाव दुकानांमध्ये ई पॉस (Adhaar Enabled Public Distribution System) मशीन बसविण्यात आले आहे. या ई पॉसमुळे लाभार्थीची बायोमॅट्रिक ओळख पटवून शिधावस्तूंचे वाटप करण्यात येत आहे. ई पॉस मशीनद्वारे धान्य वितरणामुळे 3.64 मे. टनहून अधिक धान्याची बचत झाली आहे.

याबाबत बोलताना अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री संभाजी पाटील- निलंगेकर म्हणाले, सार्वजनिक वितरण व्यवस्था गतिमान, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्यावर राज्य शासनाने भर दिला आहे. ई पॉस मशीनद्वारे केरोसीनचे वाटप केले जात असल्यामुळे केरोसीनची सुमारे 60 टक्क्यांपर्यंत बचत झाली आहे. दरमहा सव्वा कोटी कुटुंब आधार प्रमाणीकरण करुन धान्य उचल करत असल्यामुळे विक्री व्यवहार पारदर्शक झाले आहेत. या प्रणालीमुळे लाभार्थींना राज्यातील कोणत्याही धान्य दुकानातून धान्य घेण्याची सुविधा पोर्टबिलिटी मुळे शक्य झाली आहे. ई पॉसमशीन वरील विक्री व्यवहार mahafood.gov.in या संकेतस्थळावर जनतेसाठी उपलब्ध असल्याने विभागाच्या कामकाजात पारदर्शकता येण्यास मदत झाली आहे.

ई पॉसमुळे काळाबाजार रोखण्यास मदत होण्याबरोबरच रेशन दुकानदारांना उत्पन्नवाढीसाठी प्रोत्साहन मिळाले आहे. सर्व शिधापत्रिका या आधार कार्डशी जोडण्यात आल्यामुळे पात्र लाभार्थींना नियमित धान्य मिळू लागले आहे. जून 2017 पासून सर्व रास्तभाव दुकानांतून ई- पॉस मशीनद्वारे धान्य वितरण केले जात असून 1 मे 2018 पासून आधार प्रमाणीकरण करुनच धान्य वितरण करण्यात येत असल्याचे अन्न व नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी सांगितले.

Post Bottom Ad