मुंबई - सिवरेज लाईनची सफाई करताना सफाई कामगारांचे मृत्यू होतात. अशा सिवरेज लाईनची सफाई करताना देशभरात ८२० सफाई कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष मनहर झाला यांनी दिली.
मुंबई महानगरपालिकेत सफाई कामगारांच्या समस्यांबाबत आज राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाने आढावा बैठक घेतली. या बैठकीत आयोगाचे दिलीप हाथीबेड, महेंद्र प्रसाद, पूर्ण सिंग, मुंबई महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी, अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल, प्रवीण दराडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना आतापर्यंत सिवरेज लाईनमध्ये पडून ८२० सफाई कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला झाला असून त्यापैकी ६०० कर्मचाऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आल्याची माहिती झाला यांनी दिली.
नालासोपारा येथे एका खासगी वसाहतीमध्ये सिवरेजलाईनच्या सेफ्टीक टॅंकमध्ये उतरलेल्या तीन सफाई कामगारांचा मृत्यू झाला होता. या घटनेची गंभीर दखल सफाई आयोगाने घेतली आहे. हे सफाई कामगार स्थानिक स्वराज्य संस्थेचे नव्हते. त्यांना संबंधित वसाहतीमधील नागरिकांना सेफ्टीक टॅंक साफ करायला बोलावण्यात आले होते. त्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दहा लाख रुपये आर्थिक मदत देण्यात आली असून त्यांच्या वारसांना नोकरी देण्यात आल्याची माहिती सफाई आयोगाचे दिलीप हाथीबेड यांनी दिली.