पुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या कोल्हापूर व सांगली या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक बचाव पथके कार्यरत करण्यात आली आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात ५४ तर सांगली जिल्ह्यात ५१ पथकांचा समावेश आहे. याशिवाय पुणे,मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, नागपूर येथेही बचाव पथके कार्यरत आहेत.
राज्यातील १० जिल्ह्यांमधील ४ लाख ४८ हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. त्यात कोल्हापूर जिल्ह्यातील २ लाख ४५ हजार तर सांगली जिल्ह्यातील १ लाख ५९ हजार नागरिकांचा समावेश आहे.
पूरबाधित जिल्ह्यांमध्ये २२६ बोटींद्वारे नागरिकांना हलविण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. बाधीत नागरिकांसाठी ३७२ तात्पुरता निवारा केंद्र सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी नागरिकांना अत्यावश्यक सोईंसह वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
पूरपरिस्थितीमध्ये कोल्हापूर, सांगलीसह सातारा, ठाणे, नाशिक, पालघर,रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये ७० तालुके बाधीत झाले आहेत. बाधीत गावांची संख्या ७६१ इतकी आहे. या सर्व ठिकाणी मदत कार्य मोठ्या प्रमाणात सुरू आहे.