मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई शहराध्यक्ष व माजी मंत्री सचिन अहिर यांनी गुरुवारी हाती शिवबंधन बांधत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. अहिर यांच्या सेना प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मुंबईत मोठाच झटका बसला आहे.
मातोश्री निवासस्थानी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी अहीर यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी वरळी विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार व इतर अहीर यांचे पाठिराखे मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विकास करण्यासाठी आपण शिवसेनेत प्रवेश करत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस फोडणार नाही. पण, शिवसेना पक्ष वाढवण्यासाठी अहोरात्र काम करत राहू, असे सांगत आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा शिवसेना सत्तेत येईल, अशी आशा अहिर यांनी सेना प्रवेशानंतर व्यक्त केली.
गेल्या आठवड्यात शरद पवारांना भेटलो. त्यांना माझ्या मतदारसंघातील परिस्थिती कळवली होती. मात्र, पक्ष सोडण्यासंदर्भात पवार यांना माहिती दिली नव्हती. पवारयांची साथ सोडताना दुख: होत आहे, अशी प्रांजळ कबुली अहीर यांनी यावेळी दिली.
आम्ही इतके दिवस एकमेकांच्या विरोधात होतो, तरी राज्याची संस्कृती जपण्याचे काम केले आहे. शरद पवार हे माझ्या ह्रदयात कायम राहतील. पण आता शरीरात शिवसैनिकाचे बळ आले आहे. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे विकास करण्याची जिद्द आहे. बाळासाहेबांनी पाहिलेलं स्वप्न साकार करण्याची संधी आपल्याला मिळत असेल तर माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे, असे अहिर यांनी सांगितले. तसेच पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारणार असल्याचे ते म्हणाले.
मला फोडलेली माणसं नको आहेत. मला मनाने जिंकलेली माणसे हवी आहेत. शिवसेनेची ताकद वाढत आहे. ही केवळ शिवसेनेची नाही तर मराठी माणसाची आणि हिंदूंची सुद्धा ताकद वाढत आहे, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रवेशावेळी म्हणाले.