मुंबई - केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार राज्यामध्ये रोटा व्हायरस लसीचा दिनांक २० जुलै, २०१९ पासून नियमित लसीकरण कार्यक्रमात समावेश करण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत सर्व लसीकरण केंद्रात जसे की, आरोग्य केंद्रे, दवाखाने, प्रसुतिगृह, सर्वसाधारण रुग्णालये, प्रमुख रुग्यालये येथे रोटा व्हायरस लसीचा नियमित लसीकरण कार्यक्रमात समाविष्ट करण्यात आला आहे. त्यासाठी राज्य शासनाकडून लसीचा पुरवठा झाला असून, मुंबईतील १ वर्षाखालील मुलांना दरवर्षी ही लस मोफत देण्यात येणार आहे.
रोटा व्हायरस लस ही तोंडावाटे दिली जाणारी लस असून, जन्माच्या ६ व्या, १० व्या व १४ व्या आठवडय़ात अन्य लसीसोबत दिली जाणार आहे. बालकांमध्ये अतिसारामुळे होणाऱया मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी रोटा व्हायरस प्रतिबंध हा प्रभावी पर्याय आहे. भारतासह जगातील ९३ देशात राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात सदर लस अंतर्भूत करण्यात आली. मुंबईत या लसीचा समावेश दिनाक २२ जुलै, २०१९ पासून करण्यात आला असून, त्यासाठी आरोग्य केंद्रे, दवाखाने, प्रसुतिगृह, सर्वसाधारण रुग्णालये, प्रमुख रुग्यालये येथील कर्मचारी यांना प्रशिक्षित करण्यात आलेले आहे. तरी सर्व सुजाण पालकांनी सदर लसीकरणाचा लाभ घेण्याचे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.