मुंबई - मुंबईत नो पार्किंग झोनमध्ये गाडी पार्क करणाऱ्या वाहनचालकांकडून मोठ्या प्रमाणावर दंड वसूल केला जात आहे. महापालिकेच्या या मोहिमेला मुंबईकरांनीही साथ दिली आहे. असं असताना मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी महापालिकेचे नियम धाब्यावर बसवत चक्क नो पार्किंग झोनमध्ये गाडी पार्क केल्याचं उघड झालं आहे. धक्कादायक म्हणजे पालिका अधिकाऱ्यांनी त्याकडे कानाडोळा करत महापौरांना दंड ठोठावला नसून त्यांच्याविरोधात कारवाईही केली नसल्याचं समोर आलं आहे.
कुठेही गाड्या पार्क केल्याने अनेकदा वाहतुकीची समस्याही उद्भवते. त्यामुळे बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी मुंबई महापालिकेने गेल्या काही दिवसांपासून मोहीम उघडली आहे. त्यासाठी पालिकेने भरारी पथके नियुक्त केली आहेत. नो पार्किंग झोनमध्ये गाड्या पार्क करणाऱ्यांकडून गेल्या सात दिवसात पालिकेने २३ लाखांचा दंडही वसूल केला आहे. मुंबईकरांनीही त्याला भरभरून प्रतिसाद दिलेला असताना मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी मात्र मुंबईतल्या मालवणी अस्वाद हॉटेलबाहेर नो पार्किंग झोनमध्ये गाडी पार्क करून पालिकेच्याच नियमांचं उल्लंघन केलं आहे. तसेच पालिकेच्या अधिकाऱ्यांनीही महापौरांकडून दंड न वसूल केल्याने मुंबईकरांमधून संताप व्यक्त केला जात आहे.