मुंबई - कष्टकऱ्यांच्या चळवळीत आपल्या शाहिरीने प्रबोधन करणारे आणि संयुक्त महाराष्ट्राच्या नवनिर्मितीमध्ये आपले मोलाचे योगदान देणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील विविध फुले-आंबेडकरी, पुरोगामी व डाव्या विचारांच्या संघटनांची नुकतीच बैठक पुण्यात पार पडली. यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या जन्मशताब्दी समितीतर्फे शाहिर अण्णाभाऊ साठे, शाहिर अमर शेख यांची गाजलेली दुर्मिळ गाणी, पोवाडे, राज्यातील सर्व विद्यापीठात अण्णाभाऊंच्या कथा, कांदबऱ्या, लोकनाट्य, चित्रपटांवर चलचित्रे, परिसंवाद आयोजित करण्यात येणार आहेत. त्याशिवाय, काही प्रमुख शहरात साहित्य संमेलने, अण्णाभाऊंच्या निवडक कथा आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर संमेलने भरवण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. अण्णाभाऊंच्या चित्रपटांचा महोत्सवही काही शहरात आयोजित करण्यात येणार आहे. या जनशताब्दी समितीच्या सल्लागारपदी महाराष्ट्रातील फुले-आंबेडकरी, पुरोगामी नामवंत साहित्यिक-कलावंत यांचा समावेश असणार आहे.