मुंबई - मुंबई, उपनगरांसह ठाणे, नवी मुंबईत मंगळवारी रात्रभर पाऊस कोसळला. यामुळे मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचलं होतं. दादर-हिंदमाता, किंग सर्कल, सायन आदी भागांत पाणी तुंबलं होतं. सायन येथे रेल्वे रुळांवर पाणी साचल्यानं वाहतूक धीम्या गतीनं सुरू होती. मध्य रेल्वेवरील लोकल २०-२५ मिनिटे उशिराने धावत होत्या. परिणामी रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली. ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक १वर प्रवाशांची तोबा गर्दी पाहायला मिळाली. लोकल १५ ते २० मिनिटे उशिराने धावत असल्याची उद्घोषणा होत असली तरी, प्रत्यक्षात लोकल अर्धा तास उशिराने धावत होत्या. रस्ते वाहतुकीवरही पावसाचा परिणाम दिसला. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. मुंबईत कुलाबा येथे १७३.६ मिमी तर सांताक्रूज येथे ८४.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
'बेस्ट' वाहतूक वळवली
> हिंदमाता सिनेमा व्हाया हिंदमाता फ्लायओव्हर
> सायन रस्ता क्रमांक २४ व्हाया रस्ता क्रमांक ३
> गांधी मार्केट व्हाया ब्रिज आणि भाऊ दाजी लाड मार्ग
> अलंकार टॉकीज ते भेंडी बाजार व्हाया डॉन टाकी ते जे. जे. हॉस्पिटल
> प्रतीक्षा नगर व्हाया जयशंकर याग्निक मार्ग
> गोरेगाव सिद्धार्थ हॉस्पिटल व्हाया गजानन महाराज चौक
> एस. व्ही. नॅशनल कॉलेज व्हाया लिंक रोड