मुंबई -- मुंबईत दमदार हजेरी लावलेल्या पावसाने सोमवारी चौथ्या दिवशीही कोसळधार सुरु ठेवल्याने मुंबईच्या वाहतुकीचा वेग मंदावला होता. जोरदार पावसामुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील लोकल २० ते २५ मिनिटे उशिराने धावत होत्या. सायन, किंग्ज सर्कल रेल्वे रुळावर पाणी भरले होते. मुंबईतल्या सखल भागात ठिकठिकाणी पाणी साचल्याने रस्त्यावरील वाहतूकही खोलंबल्याने मुंबईकरांचे हाल झाले. येत्या २४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्यादृष्टीने पालिकेने यंत्रणा सज्ज ठेवली आहे.
मुंबईत लांबलेल्या पावसाने दमदारपणे सुरुवात केली असून मागील चार दिवसांत ८५ टक्के इतका झाला आहे. रविवारी सकाळी जोरदार कोसळून दुपारनंतर काही तास उघडीप घेत रात्री पुन्हा जोरदार बरसला. पावसाची संततधार सोमवारीही सकाळपासून कायम राहिल्याने मुंबईतील सखल भागात जागोजागी पाणी साचले होते. गांधी मार्केट, किंग सर्कल, दादर टीटी, हिंदमाता, चेंबूर, शेलकाॉलनी, चेंबूर कॉलनी, आरसीएफ कॉलनी, प्रतीक्षा नगर, मिलन सबवे, अंधेरी सबवे, वांद्रे आदी ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूकीचा बोजवारा उडाला होता. किंग्ज सर्कल, गांधी मार्केट, प्रतिक्षा नगर येथे गुडघाभर पाणी साचले होते. किंग्जसर्कल, सायन येथील रेल्वे रुळावर पाणी साचल्याने या मार्गावरून जाणा-या प्रवाशांचे हाल झाले. तिन्ही मार्गावरील वाहतुकीचा वेग मंदावल्याने रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची तुडुंब गर्दी झाली होती. धारावी येथील मुख्याध्यापक नाला, डेब्रिज, प्लास्टिक, फ्लोटींग मटेरियलने तुंबल्याने तेथे पाण्याचा निचरा करणा-या पंपामध्ये हा सर्व कचरा अडकल्याने हा पंपच बंद पडला. त्यामुळे येथे पाणी निचरा करता न आल्याने परिसरात पाणी तुंबले होते. दादर येथील हिंदमाताजवळ नेहमीप्रमाणे यंदाही पाणी तुंबले होते. कोट्यवधी रुपये खर्च करून ब्रिटानिया पंपिंग स्टेशन बांधूनही पाणी तुंबण्याची समस्या सुटलेली नाही. येथे मायक्रो टनेलिंगची कामे सुरु आहेत, मात्र त्या ठिकाणची जुनी खोलवर रुजलेली ५२ झाडे या कामासाठी अडथळा ठरत आहेत. त्यामुळे ही समस्या ही झाडे काढल्याशिवाय सुटणार नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. सकाळी ११ वाजता हाईटाईड होती. मात्र याचवेळी नेमका पाऊस थांबला होता. पाऊस जोरदार कोसळला असता तर मुंबई तुंबली असती.
९७ ठिकाणी झाडे पडली-
शहरात ४६, पूर्व उपनगरांत १२ व पश्चिम उपनगरांत ३९ ठिकाणी झाडे व झाडाच्या फांद्या पडल्या. तर १९ ठिकाणी घराच्या भिंती कोसळल्या. या घटनांत कोणीही जखमी झालेले नाही.
विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू -
शिवाजी नगर गोवंडी येथे एलिगंड शाळेजवळ घरात विजेचा धक्का लागून महम्मद कैयुम काझी (३०) हे जखमी झाले. त्यांना राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केला असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
रेल्वे वाहतूक --
मरिनलाईन्स येथे रेल्वेच्या हद्दीत बांधकामासाठी एकत्र ठेवण्यात आलेले लाकडी बांबू जोरदार हवेमुळे ओव्हरएड वायरवर पडले. त्यामुळे काही वेळाकरीता येथील वाहतूक थांबवण्यात आल्याने प्रवाशांचे हाल झाले.
रेल्वे रुळावर पाणी --
सायन व कुर्ला येथे रेल्वे रुळावर पाणी साचल्य़ाने जलद वेगावरील वाहतूक धिम्या गतीने सुरु होती. तर हार्बर मार्गावरील वाहतूक १५ ते २० मिनीटे उशिराने सुरु होती.
येथे पाणी साचले --
शहर -- हिंदमाता, परळ टीटी, गांधी मार्केट, शक्कर पंचायत चौक, वडाळा, लक्ष्मी नारायण लेन, माटुंगा, सायन कोळीवाडा, रावळी कॅम्प, पोस्ट ऑफिस, हिंदू कॉलनी, किडवाई नगर कॉलनी, वडाळा, काळाचौक, दादर प्लाझा, रानडे रोड.
पूर्व उपनगर -- पोस्टल कॉलनी, चेंबूर, नेहरु नगर, ब्रिज, कुर्ला, विद्याविहार रोड, कोहिनुर मॉल, कुर्ला, महाराष्ट्र नगर, मानखुर्द, फ्रीवे चेंबूर, पांजरापोळ टनेल, चेंबूर कॅम्प, कलेक्टर कॉलनी, एमजी रोड, घाटकोपर
पश्चिम उपनगरे -- जवाहर नेहरू, खार, आदर्शनगर, एमएचबी कॉलनी, खेरनगर, बांद्रा बस डेपो,
येथे पाणी तुंबल्याने वाहतूक वळवली --
गांधी मार्केट, किंग सर्कल, दादर टीटी, हिंदमाता, चेंबूर, शेलकाॉलनी, आरसीएफ कॉलनी, प्रतीक्षा नगर, मिलन सबवे, अंधेरी सबवे, वांद्रे, अनुशक्ती नगर, चिता कॅम्प, मंडाला,
पालिकेची यंत्रणा सज्ज --
येत्या २४ तासांत मुंबई व उपनगरांत मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्यादृष्टीने मुंबई महापालिकेने आपली यंत्रणा सज्ज ठेवली आहे. नेव्हीच्या ९ टीम व सहा फ्लड रेस्क्यु टीम अत्याधुनिक साधनांसह तैनात ठेवण्यात आल्या आहेत. तसेच गेल्या चार दिवसाच्या पावसात सहा पंपिंग स्टेशनवर ४३ पंप आहेत, त्यातील ३२ वापरावे लागले. तर ३५० ठिकाणी आवश्यकते नुसार पंप बसवण्यात आले आहेत. गेल्या चार दिवसांत २८७ पंप वापरावे लागले. द्वीटरवर आलेल्या चार हजार २७० तक्रारी हाताळण्यात आल्या. त्यामध्ये ५२ हॉ़टलाईन, बाहेरच्या २२ एजन्सी ऑनलाईन तक्रारी घेण्यासाठी सज्ज आहे. माय़ बीएमसी ट्वीटरवर ८५०० तक्रारी आल्या. सहायक आयुक्त २३ विभागात ट्वीटर हाताळण्यासाठी तैनात आहेत. सर्वे केल्यानंतर ५० टक्के लोकांनी याबाबत समाधान व्यक्त केल्याचे पालिकेचे उपायुक्त चंद्रशेखर चौरे यांनी सांगितले.