मुंबई दि. 31 - आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेत्यांचा सन्मान केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी कायम ठेवत त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा; योगदानाचा गौरव कायम केला आहे. यंदाचे वर्ष दिवंगत रिपब्लिकन नेते घटनातज्ञ बी. सी. कांबळे यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष असून त्याबाबतची आठवण ठेऊन बी सी कांबळे यांची जन्मशताब्दी रिपाइं तर्फे वर्षभर साजरी करण्याचा निर्णय रामदास आठवलेंनी घेतला असल्याचे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि महाराष्ट्र शासनाचे सामाजिक न्याय राज्यमंत्री अविनाश महातेकर यांनी केले.
दादर पूर्वेच्या नायगाव मधील पद्मशाली सभागृहात रिपाइं मुंबई प्रदेश च्या वतीने दिवंगत रिपब्लिकन नेते घटनातज्ञ बी सी कांबळे यांच्या जन्मशताब्दी निमित्त आयोजित जाहीर अभिवादन सभेत अविनाश महातेकर बोलत होते. यावेळी बोलताना महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्रकार; अनुवादक; भाष्यकार संपादक तसेच उत्कृष्ट संसदपटू;फर्डे वक्ते म्हणून बी सी कांबळे यांचे आंबेडकरी चळवळीत मोठे योगदान राहिले आहे.मुंबईत आमदार असताना बी सी कांबळे यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मोठे योगदान दिले होते त्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांना संयुक्त महाराष्ट्राच्या मुद्यावरून सळोकीपळो करून सोडले होते असे अविनाश महातेकर यावेळी म्हणाले. महाराष्ट्र शासनाच्या पातळीवर दिवंगत रिपब्लिकन नेते बी सी कांबळे यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्याबाबत प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन अविनाश महातेकर यांनी दिले.