१ जुलै ते ३० सप्टेंबर कालावधीत समुद्रात २२ दिवस मोठी भरती
मुंबई -- मुंबईला शुक्रवारपासून सलग पडणा-य़ा पावसाने मुंबईला चांगलेच झोडपले आहे. सुदैवाने यातील तीन दिवसात समुद्राला मोठी भरती नव्हती. अन्यथा मुंबईत मोठ्या प्रमाणात पाणी साचले असते. दरम्यान, पुढील सात दिवस धोक्याचे असून समुद्रात ४.७९ मिटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत.
जून महिना संपता संपता पडलेल्या पावसा दरम्यान, तीन दिवस समुद्राला भरती होती. या भरतीच्या वेळेत जर जोरदार पाऊस पडला असता तर मुंबईत पाणी साचले असते. मात्र तो धोका टळला आहे. मात्र आता जुलै महिन्यातीमल पुढील सात दिवस धोक्याचे असणार आहेत. ५ जुलै रोजी दुपारी २.०६ वाजता समुद्राला मोठी भरती असून त्यावेळी ४.७९ मिटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. १ जुलै ते ३० सप्टेंबर या कालावधीत २२ दिवस समुद्रात मोठी भरती असून किमान ४.५१ मिटर ते ४.९१ मिटर एवढया उंचीपर्यंतच्या लाटा उसळणार आहेत. ऑगस्ट महिन्यात १,२,३,४,५,२९,३० व ३१ या तारखांना , सप्टेंबर महिन्यात १,२,३,२७,२८,२९ व ३० या तारखांना समुद्रात किमान ४.५१ मिटर ते ४.९१ मिटर एवढया उंचीपर्यंतच्या लाटा उसळणार आहेत.
मुंबईची भौगोलिक स्थिती पाहता या शहरात जोरदार पाऊस पडत असेल व त्याच वेळी समुद्रात मोठी भरती असेल आणि ४.५० मिटर उंचीपेक्षा जास्त उंचीच्या लाटा उसळत असतील तर मुंबईत सखल भागात पाणी साचण्याची शक्यता अधिक असते. कारण, त्यावेळी समुद्रात सांडपाणी सोडण्यासाठी वापरण्यात येणारे फ्लड गेट्स बंद ठेवण्यात येतात. परिणामी मुंबईत सखल भागात पाणी साचते.
जुलै महिना समुद्रात ७ दिवस मोठी भरती --
दिनांक वेळ लाटांची उंची (मिटर)
२ जुलै ११.५२ वा. ४.५४ मि.
३ जुलै १२.३५ वा. ४.६९ मि.
४ जुलै १३.२० वा. ४.७८ मि.
५ जुलै १४.०६ वा. ४.७९ मि.
६ जुलै १४.५२ वा. ४.७४ मि.
७ जुलै १५.४१ वा. ४.६० मि.
३१ जुलै ११.३१ वा. ४.५३ मि.