मुंबई - मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून पावसाने जोरदार कमबॅक केले आहे. बुधवारी जोरदार बरसल्यानंतर गुरुवारी अधून मधून सरीवर सरी कोसळला. आकाशही ढगांनी दाटून आले होते. हवामान विभागाकडून शुक्रवारी, २६ जुलैला मुंबईत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. सध्या मुंबईमध्ये पावसाचे वातावरण निर्माण झाले असून पुढील चार - पाच दिवस मुंबईतील काही भागात तीव्र तसेच मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता 'स्कायमेट'ने वर्तवली आहे.
मुंबईत दोन दिवसांपासून समाधानकारक पाऊस पडतो आहे. तलाव क्षेत्रातही दमदार पाऊस पडल्याने गुरुवारी तानसा तलाव भरून ओसंडून वाहू लागल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. बुधवारी व गुरुवारी पडलेला पाऊस आणि आकाशात भरून आलेले ढग यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. २६ जुलैला मुंबईसह दक्षिण आणि उत्तर कोकणातही अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच २७ व २८ जुलैलाही मुंबईत जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज ‘स्कायमेट’ने वर्तवला आहे.