नवी दिल्ली - महाराष्ट्रात होऊ घातलेल्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती करण्यात आली आहे. थोरात यांच्या दिमतीला डॉ. नितीन राऊत, बसवराज पाटील, विश्वजीत कदम, यशोमती ठाकूर आणि मुजफ्फर हुसैन असे पाच कार्यकारी अध्यक्षही देण्यात आले आहेत.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी आठ समित्यांचीही घोषणा करण्यात आली आहे. बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली १५ सदस्यांची रणनीती समिती स्थापन करण्यात आली असून माजी प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण या समितीचे सहअध्यक्ष, तर हर्षवर्धन पाटील निमंत्रक असतील. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली २८ सदस्यीय जाहीरनामा समिती, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली २३ सदस्यीय समन्वय समिती, बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली ३३ सदस्यांची प्रदेश निवडणूक समिती, नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली ६१ सदस्यीय प्रचार समिती, रत्नाकर महाजन यांच्या अध्यक्षतेखाली २२ सदस्यीय प्रसिद्धी आणि प्रकाशन समिती आणि राजेंद्र दर्डा यांच्या अध्यक्षतेखाली १८ सदस्यीय माध्यम आणि संवाद समिती स्थापन करण्यात आली आहे. शरद रणपिसे यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय उपसमितीसह १० सदस्यांची निवडणूक व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली आहे.