डास प्रतिबंधासाठी ८ हजार टायर्स हटविले - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 July 2019

डास प्रतिबंधासाठी ८ हजार टायर्स हटविले


मुंबई - पावसाळ्यात साचलेल्या पाण्यात डेंग्यू, मलेरीयाच्या डांसाचे प्रमाण अधिक असते. यावर प्रतिंबधांत्मक उपाययोजना करण्यासाठी पालिकेने कंबर कसली असून सहा महिन्यात सुमारे ८ हजार टायर्स हद्दपार केले आहेत. तसेच २ लाख ८४ हजार १३९ वस्तू हटविण्यात आल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

पावसाळ्यात साथीचे आजार डोके वर काढतात. त्यामुळे 'एडिस इजिप्ती' डासांची उत्पत्तीस्थळे तात्काळ नष्ट करण्याची मोहीम पालिकेने हाती घेतली आहे. बाटलीचं झाकण, टायर, थर्माकोल, नारळाच्या करवंट्या, वातानुकुलन यंत्रणा, शीतकपाटाचा (रेफ्रिजरेटर) डिफ्रॉस्ट ट्रे, रिकामी शहाळी, रोप कुंड्यांखालील ताटल्या यासारख्या विविध वस्तूंमध्ये साचलेल्या काही थेंब पाण्यात ही डासांची उत्पत्ती होते. परिणामी, डेंग्यू, हिवताप यासारख्या घातक रोगांच्या प्रसारासाठी कारणीभूत ठरतात. यामुळे पाणी साचू शकेल, अशा वस्तू सातत्याने हटविणे व त्यात साचलेले पाणी नष्ट करणे अत्यंत गरजेचे आहे. पालिकेने याच अनुषंगाने कार्यवाहीला सुरुवात केली असून १ जानेवारी ते २० जुलै २०१९ या कालावधीत ८ हजार ७२९ टायर्स हटविले असून २ लाख ८४ हजार १३९ एवढ्या छोट्या - मोठ्या पाणी साचू शकणा-या इतर वस्तूही हटविल्या आहेत. गेल्या सात महिन्यात करण्यात आलेल्या कार्यवाही दरम्यान 'एफ दक्षिण' विभागात सर्वाधिक म्हणजे ८८४ टायर्स हटविण्यात आले आहेत. तर त्या खालोखाल 'एम पूर्व' विभागातून ५८६ व 'के पूर्व' विभागातून ५६९ टायर्स हटविण्यात आले आहेत. तसेच पाणी साचून राहणारे चहाचे कप, कागदी पेले, थर्माकोल, नारळाच्या करवंट्या, फोडलेली शहाळी, पत्रे, पन्हाळे, घरावर टाकलेले प्लास्टिक यासारख्या वस्तू देखील नष्ट केल्या आहेत. याअंतर्गत गेल्या सात महिन्यात सर्वाधिक म्हणजे ५१ हजार ५३४ वस्तू महापालिकेच्या 'ई' विभागातून हटविण्यात आल्या. त्या खालोखाल २३ हजार ९९० वस्तू 'आर मध्य' विभागातून, तर २२ हजार ३७८ वस्तू या 'ए' विभागातून हटविण्यात आल्याची माहिती पालिका कीटकनाशक विभागाचे अधिकारी राजन नारिंग्रेकर यांनी दिली आहे. तसेच नागरिकांनी देखील डास प्रतिबंधाबाबत आवश्यक ती सर्व काळजी घेऊन महापालिकेच्या कीटकनाशक विभागास सहाय्य करावे, असे आवाहन केले.

कोरडा दिवस पाळा - 
पालिकेने केले आवाहन 
अनेक घरांच्या बाहेर पाणी साठवण्यासाठी पिंप वा ड्रम वापरले जातात. यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात डेंगी आजार पसरविणाऱ्या डासांच्या अळ्या आढळून येतात. याकरिता हे पिंप व इतर पाणी साठवण्यची भांडी आठवड्यातून एक दिवस पूर्णपणे कोरडे ठेवून आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा, असे आवाहन पालिकेने केले. पाण्याचे पिंप वा पाणी साठवण्याची इतर भांडी प्रथम पूर्णपणे उलटे करुन ठेवावीत. त्यानंतर काही वेळाने हे पिंप व इतर भांडी कोरड्या व स्वच्छ कापडाने आतून पुसावीत, जेणेकरून पिंपाच्या आतील बाजूला चिकटलेली डासांची अंडी नष्ट होतील, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.

Post Bottom Ad