मुंबई - डॉक्टरांवर कोणत्याही प्रकारचे हल्ले होणार नाहीत, त्यांना पूर्णपणे सुरक्षित वातावरणामध्ये काम करता येईल ही सरकारने दिलेली हमी पुन्हा एकदा फोल ठरली आहे. वैद्यकीय उपचारासाठी पालिकेच्या नायर रुग्णालयामध्ये दाखल केलेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर संतापलेल्या दहा ते बारा जणांच्या जमावाने रविवारी तीन डॉक्टरांना मारहाण केली. त्यांना वाचवण्यासाठी धावून आलेल्या सुरक्षारक्षकांनाही त्यांनी चोप दिला.
मृत रुग्णाला क्षयरोग तसेच इतर संसर्गजन्य आजाराची लागण झाली होती. रविवारी सकाळी सात वाजता त्याला नायर रुग्णालयामध्ये उपचारासाठी आणण्यात आले तेव्हा त्याची प्रकृती अत्यंत गंभीर होती. त्याला स्थिर करण्याच्या दृष्टीने डॉक्टरांचे हरतऱ्हेचे प्रयत्न सुरू होते. मात्र वैद्यकीय उपचारादरम्यान या रुग्णाचा संध्याकाळी मृत्यू झाला. हे रुग्णाच्या नातेवाईकांना सांगण्यासाठी गेलेल्या डॉक्टरांना जमावाने मारहाण केली. या तीन डॉक्टरांमध्ये एका महिला डॉक्टरचाही समावेश आहे. य़ा प्रकरणी आग्रीपाडा पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा नोंदवण्यात आला.