मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज मंडईत मासे विक्री करणाऱया कोळी महिला या मूळ भूमिपुत्र असून त्यांना ऐरोली येथे स्थलांतरित केले जाणार नाही असे प्रतिपादन मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना केले.
क्रॉफर्ड मार्केट समोरील शिवाजी महाराज मंडईची इमारत धोकादायक ठरल्याने येथील मासळी बाजार ऐरोली येथे हलविला जाणार असल्याच्या नोटीस कोळी भगिनींना प्राप्त होताच शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोळी भगिनींवर कुठल्याही प्रकारचा अन्याय होऊ नये याबबतचे निर्देश महापौरांना दिले होते. त्यानुसारच महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्यासोबत आज (दि. १९ जुलै २०१९) बैठक घेतली. बैठकीनंतर प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना ते बोलत होते.
टॅक समितीचा अहवाल प्राप्त होइपर्यंत मासेविक्री करणाऱया कोळी महिलांना स्थलांतरित करण्याचा निर्णय स्थगित करण्यात यावा. मुंबईतील कोळी महिला या येथील भूमिपूत्र असून त्यांचे अचानकपणे स्थलांतरण केल्यामुळे विभागातील नागरिकांशी त्यांचे जोडलेले नातेदेखील संपुष्ठात येणार आहे. तसेच सदरहू कोळी महिलांना ऐरोली याठिकाणी स्थलांतरित न करता ऐ विभागातच स्थलांतरित करण्यात यावे, या आशयाचे पत्र महापौरांनी महापालिका आयुक्तांना दिले होते. ऐ विभागात देण्यात येणारे स्थलांतर हे तात्पुरते स्वरुपाचेच राहणार असून याठिकाणच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर त्यांना मूळ ठिकाणीच म्हणजेच पूर्वीच्याच ठिकाणी जागा देणार असल्याचेही महापौरांनी यावेळी सांगितले.