संक्रमण गाळ्यांच्या सेवाशुल्क वसुलीसाठी ई बिलिंग सेवा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 July 2019

संक्रमण गाळ्यांच्या सेवाशुल्क वसुलीसाठी ई बिलिंग सेवा

मुंबई - मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या संक्रमण शिबिरातील भाडेकरू / रहिवाशांकडून सेवाशुल्क वसुलीकरिता ई - बिलिंग सेवा देणारी व म्हाडातील कंत्राटदारांची ऑनलाईन नोंदणी करणाऱ्या दोन स्वतंत्र ऑनलाईन सॉफ्टवेअर प्रणालीचा शुभारंभ मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला. 

म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात घोसाळकर म्हणाले की, म्हाडा एक लोकाभिमुख संस्था असल्याने सामान्य नागरिक प्रशासनाच्या केंद्रस्थानी आहेत. म्हाडाच्या अखत्यारीत ५६ संक्रमण शिबिरे असून त्यात सुमारे २२ हजार कुटुंबे वास्तव्यास आहेत. या भाडेकरू / रहिवाशी यांच्याकडून सेवाशुल्क वसुलीसाठी पुरेशा प्रमाणात कर्मचारी नाहीत. त्यामुळे मनुष्यबळाअभावी एका भाडे वसुलीकारावर अनेक वसाहतीतील सेवाशुल्क वसूल करण्याची जबाबदारी येऊन पडते. ऑनलाईन ई-बिलिंग सेवेमुळे कर्मचाऱ्यांवरील ताण कमी होणार असून संक्रमण शिबिरातील सर्व भाडेकरू / रहिवाशांना संगणकावरून घरबसल्या भाडे भरता येणार आहे. प्रायोगिक तत्वावर ५५०० संक्रमण गाळे असणाऱ्या प्रतीक्षा नगर, सायन येथे ही सेवा राबविली जाणार आहे. सदर यंत्रणा आयडीएफसी बँकेच्या पेमेंट गेटवेच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे. लवकरच बँकेच्या एटीएमप्रमाणे भाडे स्वीकारण्यासाठी यंत्रणा उभारण्याकरीता म्हाडाचे प्रयत्न सुरू असल्याचे श्री. घोसाळकर म्हणाले. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून नागरिकांना पारदर्शक व सहज सुलभ सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या दृष्टीने ही संगणकीय आज्ञावली सुरु करण्यात आली आहे. अधिकाधिक भाडेकरू / रहिवाशी यांनी या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन घोसाळकर यांनी केले. 

ऑफलाईन देयके व त्यांची गणना ही किचकट व वेळखाऊ प्रक्रिया आहे. संकलन हा या प्रक्रियेतील सर्वात महत्वाचा भाग असून माहिती व्यवस्थापनाच्या सुयोग्य वितरणामध्ये हे सॉफ्टवेअर महत्वाची भूमिका बजावणार आहे. या सॉफ्टवेअरनुसार मिळकत व्यवस्थापक, उपमुख्य अभियंता, भाडे वसुलीकार, लेखा विभाग यांच्या भूमिका निश्चित करण्यात आल्या असल्याचे घोसाळकर यांनी सांगितले. संक्रमण शिबिरातील भाडेकरू रहिवाशांना सेवाशुल्क भरण्याकरिता म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर असणार्‍या rrebilling.mhada.gov.in या लिंकवर ही सुविधा उपलब्ध आहे. 

या व्यतिरिक्त कंत्राटदारांच्या नोंदणीसाठी देखील सॉफ्टवेअर तयार करण्यात आले असून त्यासाठी कंत्राटदार नोंदणी पोर्टलवर कंत्राटदाराने एकदाच नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीनंतर सर्वप्रथम अर्ज सादर करणे, आवश्यक कागदपत्र अपलोड करणे, ऑनलाईन पेमेंट करणे व त्यानंतर अर्ज सादर करणे असे टप्पे असणार आहेत. या सुविधेमुळे कंत्राटदारांची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन होणार असून त्यांचा वेळ वाचणार असून त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होणार आहे. या सॉफ्टवेअरमुळे संपूर्ण काम पेपरलेस होण्याबरोबरच माहितीच्या व्यवस्थापनाचे केंद्रीकरण, कंत्राटदारांच्या अर्जाचा मागोवा घेणे सोपे व सुलभ होणार आहे. तसेच दिलेल्या प्रमाणपत्राची खात्रीही करता येणार आहे. या माध्यमातून कंत्राटदारांची कायमस्वरूपी माहिती संकलित होणार असल्याचे घोसाळकर यांनी सांगितले. 

म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर असणार्‍या contractorregistration.mhada.gov.in या लिंकवर जाऊन कंत्राटदारांना नोंदणी करता येणार आहे. यावेळी मुंबई मंडळाचे सभापती मधू चव्हाण, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी दिनकर जगदाळे, नगरसेवक मंगेश सातमकर, रामदास कांबळे, नगरसेविका तेजस्वी घोसाळकर आदी उपस्थित होते.

Post Bottom Ad