मुंबई - पश्चिम रेल्वेच्या मालाड रल्वे स्थानकावरील जिना उतरताना रेलिंगचा धारदार भाग लागल्याने एका महिलेचे अर्धे बोट कापले गेले. मीनल उमराव असे या ५१ वर्षीय महिलेचे नाव असून त्या वांद्रे येथील एका कंपनीत कम्प्युटर ऑपरेटरची नोकरी करतात. या घटनेनंतर रेल्वेच्या अभियंत्यांनी घटनास्थळाचा दौरा केला. अभियंत्याना स्टील कॅपमध्ये काही चुकीचे आढळले नाही. मात्र, या रेलिंगचा सखोल तपास केला जाणार आहे.
मीनल उमराव बुधवारी सकाळी १०.४५ वाजता मालाड स्थानकाच्या फलाट क्रमांक २ वरील जिन्यावरून उतरत होत्या. त्या वेळी रेलिंगच्या स्टीलच्या कॅपमध्ये त्यांच्या उजव्या हाताचे बोट अडकले. त्यांनंतर तोल जावून त्या खाली कोसळल्या. स्टील कॅप धारदार असल्याने त्यांच्या हाताचे अडकलेले बोट कापले गेले. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर उपचार करण्याची तयारी दाखली. मात्र, मीनल यांच्या पतींनी त्यांना खासगी रुग्णालयात नेले. मीनल यांना नुकसान भरपाईपोटी ५ हजार रुपये दिल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मीनल यांच्यावर गुरुवारी शस्त्रक्रिया केली जाणार असून तुटलेले बोट पुन्हा जोडले जाणार असल्याची माहिती त्यांच्या पतीने दिली.