मुंबई - डॉ पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील आरोपी डॉ भक्ती मेहर, डॉ अंकिता खंडेलवाल आणि डॉ हेमा अहुजा या तिघींनाही पोलीस कोठडीत पाठवण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. पण न्यायालयीन कोठडीतच या तिघींची चौकशी करण्याची मुभा गुन्हे अन्वेषण विभागाला देण्यात आली आहे.
गुन्हे अन्वेषण विभागाने या तिघींची चौकशी करण्यासाठी पोलीस कोठडीची मागणी केली होती. तशी याचिकाही मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. ही याचिका न्यायालयाने मात्र आज फेटाळली आहे. पण असं असतानाही न्यायालयीन कोठडीतच तिन्ही आरोपींची चौकशी करण्याची मुभा गुन्हे अन्वेषण विभागाला देण्यात आली आहे. आज दुपारी २ ते ६ आणि पुढचे तीन दिवस सकाळी ९ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत गुन्हे अन्वेषण विभागाला आरोपींची चौकशी करता येणार आहे.
२२ मेला पायलने आत्महत्या केल्यानंतर मोठ्या प्रमाणात निर्दशनं करण्यात आली. संबंधित रुग्णालयाबाहेरही या घटनेचा निषेध करण्यात आला. या प्रकरणी डॉ भक्ती मेहर, डॉ अंकिता खंडेलवाल आणि डॉ हेमा अहुजा या तिघींवर आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. या तिघींना अंतरिम जामिन देण्यात यावा अशी मागणी उच्च न्यायालयात करण्यात आली होती. सेशन्स कोर्टात या मागणीवर १० जूनला सुनावणी होणार असून या तिघींना तात्काळ न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.