मुंबई - मंत्रालय, विधान भवन परिसरात सुरु असलेल्या मेट्रो- ३ च्या कामांमुळे मच्छरांची उत्पत्ती होत असल्याने आतापर्यंत या भागातील १२ जणांना मलेरिया, डेंग्यू झाल्याचे समोर आले आहे. येथील खोदकामामुळे पाणी साचते, हे पाणी साचू देऊ नका असे पालिकेने पालिकेला पत्राने कळवले असल्याचे एका अधिका-याने सांगितले.
मुंबईत मंत्रालय, विधान भवन परिसरात मेट्रो - ३ चे काम सद्या सुरु आहे. या कामा दरम्यान करण्यात येणा-या खोदकामामुळे पडणा-या खड्ड्यांमध्ये पाणी साचते. याकडे दुर्लक्ष झाल्याने परिसरात डासांची उत्पत्ती होण्यास मदत झाली आहे. परिसरात डास पसरल्याने मंत्रालयातील कर्मचारी हैराण झाले आहेत. परिसरातील १२ जणांना मलेरिया, डेंग्यूची लागण झाली आहे. मेट्रोचे काम करणा-या काही कामगारांना मलेरिया झाल्याने ते सुट्टीवर गेल्याचे येथील कामगारांनी सांगितले. येत्या काही दिवसानंतर पावसाळी अधिवेशन आहे. त्यामुळे येथे ये- जा करणा-यांची गर्दी वाढणार आहे. त्यामुळे येथे झपाट्याने पसरणा-या डासांमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. पालिकेच्या संबंधित विभागाने याची दखल घेतली असून येथे खोदकामामुळे साचणा-या पाण्याकडे मेट्रोने लक्ष द्यावे, पाणी साचू देऊ नये असे पत्र एमएमआरडीएला पाठवले आहे. पावसाळा व येत्या काही दिवसांत येथे सुरु होणा-या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर योग्यवेळी कीटकनाशक फवारणी पालिकेकडून केली जाणार आहे. मेट्रो प्रशासनालाही काळजी घेण्याबाबत कळवण्यात आले असल्याचे पालिकेच्या एका अधिका-याने सांगितले.