मुंबई - लोकसभा निवडणुकीनंतर राज्य मंत्रिमंडळाचा फेरबदल होण्याची शक्यता असून राधाकृष्ण विखे-पाटलांची वर्णी लागणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. या फेरबदलात राधाकृष्ण विखे पाटील यांना कृषिमंत्री पद मिळण्याची शक्यता आहे. कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या निधनानंतर हे पद रिक्त होते. मात्र विखे-पाटील यांना कृषी खात्यापेक्षा महसूल खात्यात जास्त रस असल्याचीही चर्चा आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राधाकृष्ण विखे-पाटील भाजपामध्ये प्रवेश करतील अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याचबरोबर जयदत्त क्षीरसागर, विजयसिंह मोहिते-पाटील यांचादेखील भाजपामध्ये प्रवेश होऊ शकतो, अशीही चर्चा आहे. एकूणच विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर आली असतानाच मंत्रिमंडळात हे नवे बदल होण्याची चिन्हे आहेत. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार हा 23 मे रोजीच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालावर अवलंबून आहे. भाजपाची सत्ता आल्यास राज्यात विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत विचार केला जाणार आहे.