मुंबई - सोशल मीडिया साइटवर मैत्री सांभाळून करा, असे सांगून सुद्धा अनेकजण याकडे दुर्लक्ष करतात. याचा परिणाम म्हणून अशा लोकांना फसवणुकीला सामोरे जावे लागते. असाच प्रकार माटुंगा येथील एका शिक्षिकेसोबत घडला आहे. माटुंगा येथे खासगी शिकवणी घेणाऱ्या या शिक्षिकेला फेसबुकवरील मैत्री चांगलीच महागात पडली. परदेशातील मित्राने भारतात भागीदारीमध्ये व्यवसाय सुरू करण्याचे आमिष दाखवून या शिक्षिकेला चार लाख ७० हजारांचा गंडा घातला. याप्रकरणी माटुंगा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
माटुंगा येथे वास्तव्यास असलेल्या रमा (बदललेले नाव) या खासगी शिकवणी घेतात. गेल्या महिन्यात मार्क गॅरी नावाच्या परदेशी तरुणाने त्यांना फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. ही रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर दोघांमध्ये संवाद सुरू झाला. आपण व्यावसायिक असून भारतामध्ये भागीदारीमध्ये हॉटेल सुरू करण्याचा विचार असल्याचे मार्क याने रमा यांना सांगितले. भागीदार शोधण्यासाठी मुंबईत येणार असल्याचे मार्क याने सांगितले. त्यानुसार ८ एप्रिलला तो मुंबईला येण्यासाठी निघाला. त्याने तिकीट आणि विमानात बसल्याचा फोटो व्हॉट्सअॅपवरून रमा यांना पाठवला. त्यामुळे रमा यांचा त्याच्यावर विश्वास बसला. दुसऱ्या दिवशी रमा यांना एका महिलेचा फोन आला. दिल्ली विमानतळावरील इमिग्रेशन अधिकारी बोलत असल्याचे सांगत तिने मार्कला ओळखता का विचारले. रमा यांनी होकार देताच, तुमचा मित्र दहा लाख पाऊंड घेऊन विमानतळावर उतरले आहेत. इतके परदेशी चलन विमानतळाबाहेर सोडता येणार नाही. ही रक्कम जप्त केली आहे. ती सोडवण्यासाठी भारतीय चलनात रुपांतरित करावी लागेल, असे तिने सांगितले. हे प्रकरण मिटवण्यासाठी, तसेच भारतीय चलनात रूपांतर करण्यासाठी त्याचप्रमाणे इतर वेगवेगळी करणे सांगून मार्क याने रमा यांच्याकडून ४ लाख ७० हजार रुपये उकळले. विशेष म्हणजे आपल्याकडील पैसे संपल्याने रमा यांनी व्याजाने दुसऱ्याकडून पैसे घेऊन विमानतळावरील अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या खात्यांवर भरले. इतकी रक्कम भरल्यानंतर रमा यांनी मार्क याच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचा मोबाइल बंद होता. सोशल मीडियावरही तो दिसत नव्हता. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी माटुंगा पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार केली.