पीएम किसान योजनेचा १५ कोटी शेतकऱ्यांना होणार फायदा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

31 May 2019

पीएम किसान योजनेचा १५ कोटी शेतकऱ्यांना होणार फायदा

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी दुसऱ्यांदा पंतप्रधान पदासाठी शपथ घेतली. पदग्रहण केल्यानंतर मोदींनी शुक्रवारी दुसऱ्या कार्याकाळातील पहिली वहिली कॅबिनेट बैठक घेतली. याशिवाय पंतप्रधान किसान योजनेचा लाभ आता देशातील सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे. यात शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये मिळणार आहेत. याचा देशातील १५ कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

याशिवाय दहशतवादी, नक्षलवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांच्या मुलांना पंतप्रधान शिष्यवृत्ती योजनेच्या माध्यमातून यापुढे वाढीव शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. तसेच आतापर्यंत या शिष्यवृत्तीचा लाभ सैन्यदलातील निवृत्त अधिकाऱ्यांच्या पाल्यांनाच होत असे. मात्र, यापुढे पंतप्रधान शिष्यवृत्तीचा फायदा हुतात्मा पोलिसांच्या मुलांनाही होणार आहे.

शहीद पोलिसांच्या मुलांना पंतप्रधानांचा आधार -
लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान मुंबईत झालेल्या प्रचार सभेत पोलिसांविषयी सहानुभूती दाखवत मोदींनी अनेक गोष्टी सांगितल्या होत्या. अनेक पोलिसांनी जनतेचे रक्षण करताना स्वतःच्या कुटुंबाचा विचार न करता बलिदान दिले आहे असेही ते मोदी प्रचारात म्हणाले होते. त्यामुळे दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर सर्वात पहिला निर्णय त्यांनी पोलिसांच्या मुलांसाठी घेतला आहे. मोदींच्या या निर्णयामुळे पोलीस खात्यात काम करणाऱ्या वडिलांच्या निधनानंतरही अनेक मुलांना शिक्षणाची कवाडे उघडी होणार आहेत.

पंतप्रधान शिष्यवृत्ती योजनेविषयी-
सैन्य दलातील निवृत्त अधिकाऱ्यांच्या मुलांना प्रत्येक महिन्याला उच्चशिक्षणासाठी पंतप्रधान योजनेतून शिष्यवृत्ती दिली जाते. मात्र, मोदींनी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर या शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ केली आहे. पूर्वी मुलांसाठी 2 हजार रुपये असेली शिष्यवृत्तीची रक्कम 2 हजार 500 रुपये झाली आहे. तर हीच रक्कम मुलींसाठी 2 हजार 250 रुपयांवरुन 3 हजार रुपये प्रति महिना करण्यात आली आहे. मात्र, या शिष्यवृत्तीचा लाभ वर्षभरात केवळ 500 मुलांनाच घेता येणार आहे. कारण वर्षाला 500 इतकी मर्यादा असणार आहे.

उच्च आणि तंत्रशिक्षणासाठी अनेक विद्यार्थ्यांनी घेतला लाभ-
मोदी सरकारने हा निर्णय घेण्याआधी केवळ निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांच्या मुलांनाच या शिष्यवृत्तीचा फायदा होत होता. पण मोदींच्या या नव्या निर्णयामुळे हुतात्मा पोलिसांच्या मुलांनाही याचा फायदा होणार आहे. याआधी उच्च आणि तंत्रशिक्षण घेण्यासाठी या शिष्यवृत्तीमुळे लाखो विद्यार्थ्यांना फायदा झाला आहे.

Post Bottom Ad