मुंबई - जागतिक तंबाखू विरोधी दिना निमित्ताने बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य समिती व नशाबंदी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती केली जाणार आहे. यावेळी विविध संस्था, संघटनांचे प्रतिनिधी या कार्यक्रमांत सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
"तंबाखूजन्य पदार्थ व विक्री कायदा २००३" च्या अंमलबजावणी साठी जनतेमध्ये प्रचार व प्रसार व्हावा याकरीता तंबाखूचा राक्षस, तंबाखूजन्य कायद्याची माहिती दर्शविणारे लक्षवेधक कटआऊट व पोस्टर्स तसेच पत्रकांच्या माध्यमातून प्रचार, प्रसार करण्यात येणार आहे. उपस्थित महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी, मुंबईकर यांना महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य समितीचे अध्यक्ष अमेय घोले हे तंबाखूमुक्तीची शपथ देणार आहेत अशी माहिती मंडळाच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास यांनी दिली. या कार्यक्रमास मुंबईतील व्यसनमुक्तीवर कार्य करणाऱ्या आयना मंचातील संस्था ब्रम्हकुमारी, सलाम मुंबई, कृपा फाऊंडेशन या संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.