मुंबई - लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांकडून हालचाली सुरु झाल्या आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील विधानसभेच्या तयारीला सुरुवात केली आहे.
शरद पवार यांनी १ जून रोजी पक्षातील नेत्यांची बैठक बोलावली आहे. यशवंतराव चव्हाण भवन येथे १ जूनला सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसची ही बैठक बोलावण्यात आल्याची माहिती मिळत आहे. सकाळच्या सत्रात पक्षातील ज्येष्ठ नेत्यांची तर दुपारच्या सत्रात आमदार-खासदारांची बैठक पार पडणार असल्याची माहिती मिळत आहे. या बैठकीत लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या दारुण पराभवाच्या पार्श्वभूमीवर या पराभवाची कारणे शोधण्याचा प्रयत्न केला जाईल. त्याचप्रमाणे लोकसभा निवडणुकीत झालेल्या चुका विधानसभेत होऊ नयेत यासाठीच्या उपायांवर देखील या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.