जुलैपर्यंतच्या पाणीपुरवठ्यासाठी पालिकेचे नियोजन तयार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 May 2019

जुलैपर्यंतच्या पाणीपुरवठ्यासाठी पालिकेचे नियोजन तयार

मुंबई - मुंबईकरांची तहान भागवणा-या तलावांत समानाधानकारक पाऊस झाला नसल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत आजच्या दिवशी १७ टक्के पाणीसाठ्याचा तुटवडा आहे. मात्र असे असले तरी मुंबईकरांना येत्या जुलैपर्यंत पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी पालिकेने नियोजन केले असल्याची माहिती मुख्य जल अभियंता अशोककुमार तवाडीया यांनी शुक्रवारी स्थायी समितीत दिली. दरम्यान, यावर्षी पाणीसाठा कमी असला तरी राखीव कोट्यातील पाणी वापरण्यात येणार असल्यामुळे जादा पाणीकपात केला जाणार नाही, असे प्रशासनाने स्थायी समितीत स्पष्ट केले. 

मुंबईला मोडकसागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार व भातसा अशा सात धरणांमधून दररोज ३८०० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा केला जातो. पावसाळा संपल्यानंतर १ ऑक्टोबरला आढावा घेतला जातो. यावेळी सातही तलावांत मिळून वर्षभरासाठी १४४७३६३ दशलक्ष लिटर पाणी असणे आवश्यक असते. मात्र यावर्षी १ ऑक्टोबरला तब्बल २ लाख दशलक्ष लिटर पाणीसाठा कमी असल्याचे समोर आले. त्यामुळे यावर्षी मुंबईकरांना पुरेसे पाणी कसे मिळणार असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र पालिकेने राज्य सरकारडून भातसा आणि अप्पर वैतरणातील राखीव कोट्याचा वापर करण्याची परवानगी घेतली आहे. यानुसार जुलैपर्यंत मुंबईकरांना आवश्यक असणारा पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे पाणीसाठा कमी असला तरी जुलैपर्यंत पाण्याची चिंता नसल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.
दरम्यान, उपलब्ध पाणीसाठ्यातून पावसाळ्यापर्यंत पुरेशा पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यासाठी नोव्हेंबर २०१८ पासून मुंबईत १० टक्के पाणी कपात सुरू करण्यात आली आहे. असे असले तरी मुंबईत आणखी पाणीकपात करण्यात येणार नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

पाणीसाठ्याची आजची स्थिती -- 
३ मे २०१८ - ४२७७७७ दशलक्ष लिटर
३ मे २०१९ - २४३०५१ दशलक्ष लिटर

Post Bottom Ad