मुंबई - मुंबईतील सहाच्या सहा लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपा शिवसेना युतीचे खासदार निवडून आले आहेत. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारभारावर शिक्कामोर्तब केले असून, मोदींची निर्णयक्षमता, त्यांच्यातील नेतृत्वगुण आणि धाडसी प्रवृत्ती याची भुरळ देशाची आर्थिक राजधानी म्हणवणाऱ्या या महानगरीतल्या जनमानसावर असल्याचे आजच्या निकालांनी स्पष्ट झाले आहे.
एकीकडे मोदींचा झंझावात असतानाही केवळ शिवसेनेचे मन राखण्यासाठी ईशान्य मुंबईतून किरीट सोमय्या यांचे तिकीट कापण्यापर्यंतचा समेट भाजप करू शकतो. निवडणुकीत जिंकून येणे महत्त्वाचे असते व त्यासाठी सोबत घेतलेल्या पक्षाच्या मनातील विश्वास वाढवणेही तितकेच महत्त्वाचे असते, हे भाजप नेते जाणून होते. शिवसेनेने साडेचार वर्षे केलेल्या टीकेचे अवडंबर न माजवता योग्य वेळी केलेल्या युतीचे रंग निकालात उठून दिसले आहेत. दक्षिण मुंबईतून सावंत यांच्यावरील नाराजी लक्षात घेऊन त्यांना गुजराती-मारवाडी मतांची बेगमी करून देण्यापासून ते ईशान्य मुंबईत शिवसेनेबरोबर ताळमेळ साधत मराठी मतांची बेगमी करून घेण्यापर्यंत भाजप व सेनेच्या नेतृत्वाने बाजी मारली. दक्षिण-मध्य मुंबई, उत्तर मध्य मुंबई, उत्तर पश्चिम आणि उत्तर मुंबईत मिळालेली भाजप शिवसेनेची मते पाहता २०१४ च्या मतांच्या तुलनेत त्यात फार मोठी घट झालेली दिसत नाही. उलट अनेक मतदारसंघात तर गेल्या निवडणुकीपेक्षा अधिक मताधिक्याने युतीचे उमेदवार जिंकल्याचे निकालांनी स्पष्ट झाले आहे.
विजयी उमेदवार
उत्तर मुंबई - गोपाळ शेट्टी (भाजपा)
उत्तर मध्य - गजानन कीर्तिकर (शिवसेना)
उत्तर पश्चिम - पूनम महाजन (भाजपा)
उत्तर पूर्व - मनोज कोटक (भाजपा)
दक्षिण मध्य - राहुल शेवाळे (शिवसेना)
दक्षिण मुंबई - अरविंद सावंत (शिवसेना)