कोलकाता - लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातील मतदान होत असतानाच, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. मी जर तुम्हाला थप्पड लगावली तर माझा हात मोडेल, असा पलटवार ममतांनी मोदींच्या टीकेवर केला आहे. राज्यातील बशीरहाटमध्ये शनिवारी प्रचारसभा झाली. या सभेत ममतांनी मोदींना प्रत्युत्तर दिलं.
मोदींना लोकशाहीची चपराक बसली पाहिजे, असं ममता म्हणाल्या होत्या. ममतांच्या वक्तव्याला मोदींनी पुरुलिया येथील प्रचारसभेत प्रत्युत्तर दिलं होतं. दीदींना माझ्या कानाखाली मारायची आहे असं मी ऐकलं आहे. ममतांना मी दीदी म्हणतो. त्यांचा आदर करतो. तुमची थप्पड हा माझ्यासाठी आशीर्वाद असेल आणि म्हणून तेही सहन करण्याची तयारी आहे, असं मोदी म्हणाले होते. याला उत्तर देताना, मोदींच्या कानाखाली मारण्याची भाषा मी कधीच केली नाही. त्यांना लोकशाहीची चपराक बसली पाहिजे, असं मी म्हणाले होते. मी तुम्हाला थप्पड का मारू? मी जर तुमच्या कानाखाली मारली तर माझाच हात मोडेल. तुमची छाती ५६ इंचाची आहे, मग मी तुम्हाला थप्पड कशी मारणार? असे ममता म्हणाल्या.