मुंबई - भाजलेल्या रुग्णांवर प्लास्टिक सर्जरी करण्यासाठी ऐरोलीतील बर्न रुग्णालयात जावे लागत होते. ही बाब लक्षात घेऊन पालिकेने शीव रुग्णालयात स्किन बँक सुरू केली. याच धर्तीवर आता केईएम रुग्णालयातही लवकरच स्किन बँक सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. अवयवदानासाठी काम करणाऱ्या रोटो-सोटो यांच्या मदतीने ही स्किन बँक उभारली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
भाजलेल्या रुग्णांवर प्लास्टिक सर्जरी करून त्यांना पुन्हा नव्याने आयुष्य जगण्याची संधी मिळावी, यासाठी पालिकेच्या केईएम रुग्णालयात लवकरच त्वचा पेढी (स्किन बँक) सुरू करण्यात येणार आहे. अवयवदानासाठी काम करणाऱ्या रोटो या संस्थेच्या मदतीने ही बॅंक उभारली जाणार आहे. सध्या समाजात अवयवदानासंदर्भात जागरूकता निर्माण केली जाते आहे. यात नेत्रदान आणि देहदान लोकांना माहिती आहे; पण त्वचादानाबाबत लोकांमध्ये फारशी जनजागृती नाही. मृत्यूनंतर किंवा जिवंतपणी सुद्धा त्वचादान करता येते. त्यामुळे त्वचादानाची नोंदणी केली, तर अनेकांना त्याचा लाभ होऊ शकतो.
अपघातात भाजलेल्या अनेक रुग्णांना अपंगत्व किंवा चेहरा विद्रुप होतो. अशावेळी या रुग्णांना समाजात वावरताना लोकांच्या वाईट नजरांना सामोरे जावे लागते. त्यामुळे शरीराच्या वेदना कमी झाल्या, तरी या रुग्णांच्या मनावर झालेला आघात पटकन बरा होत नाही. म्हणूनच प्लास्टिक सर्जरीद्वारे त्यांना नव्याने आयुष्य जगता यावा, यासाठी रुग्णालयात त्वचापेढी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. केईएम रुग्णालयात त्वचापेढी सुरू केल्यास भाजलेल्या रुग्णांना नक्कीच फायदा होईल, असे पालिका आरोग्य विभागाने सांगितले.