मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील हिमालय पूल दुर्घटनेला पालिकेच्या "ए" वॉर्ड कार्यालतील अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा, पालिका अभियंत्याचे दुर्लक्ष कारणीभूत आहे, असा ठपका पालिकेने चौकशी अहवालात ठेवला आहे. गुरुवारी हिमालय पूल दुर्घटनेचा अहवाल आयुक्तांना सादर झाला. या अहवालामुळे ए कार्यालयातील अधिकाऱ्यांवर पालिका आयुक्त कोणती कारवाई करतात याकडे आता मुंबईचे लक्ष लागले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील ‘हिमालय’ पुल कोसळून झालेली दुर्घटना ‘बोगस’ स्ट्रक्चरल ऑडिटमुळेच घडली. या घटनेत सात जणांना नाहक जीव गमवावा लागला. ३१ जण जखमी झाले. या दुर्घटेनची चौकशी करण्याचे निर्देश पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी मुख्य अभियंता (चौकशी) यांना दिले होते. चौकशी समितीने प्राथमिक अहवाल तत्कालीन आयुक्त अजोय मेहता यांना सादर केला. यामध्ये पाच अधिकारी आणि स्ट्रक्चरल ऑडिट करणार्या कंपनीवर दुर्घटनेला जबाबदार धरले होते. हिमालय पूल चांगल्या स्थितीतत होता. मात्र पायर्या व त्यांचे स्क्रू तुटलेले होते. चालण्यासाठी बनवलेल्या काँक्रिटच्या स्लॅबखाली लोखंडाला गंज पकडला होता. पूलाच्या बाजूच्या रेलिंगला तडे गेले होते. त्यामुळे गंज लागणार नाही असे रंगकाम करावे, जाळ्या बदलाव्यात, पायऱ्यांची दुरुस्ती करावी, अशा सुचना डी. डी. देसाई कंपनीच्या अहवालात सप्टेंबर २०१६ मध्ये म्हटले होते. या अहवालाकडे पालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. शिवाय, पूल विभागाला न कळवताच २०१६- १७ मध्ये वॉर्ड स्तरावर या पुलाचे सुशोभीकरण केले. मुख्य अभियंत्यांचा सल्लाही घेतला नव्हता. नियमबाह्य सुशोभीकरणामुळे अतिभाराने पूल कोसळला, असा ठपका या अहवालात ठेवला होता. गुरुवारी महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांना अंतिम अहवाल सादर केला. त्यामध्येही ए प्रभाग कार्यालयाने परवानगी विना पूल सुशोभिकरण केल्यामुळे भार वाढल्याने दुर्घटना झाल्याचे नमूद केले आहे. पूल विभागाचे मुख्य अभियंता, उप अभियंता, सहाय्यक अभियंत्यांनी देखील पूलाच्या परिरक्षणाचा अहवाल तपासला नाही. पुल मॅन्युअलनुसार दर तीन महिन्यांनी पुलाची तपासणी व्हायला हवी ती हिमालयबाबत झाली नाही. ऑडीटरने दिलेली डिझाईन देखील या अभियंत्यांनी गहाळ केल्याचे अहवालात नमूद आहे. तसेच मध्य रेल्वेने बाहेरगावी जाणाऱ्या गाड्यांसाठी बांधलेला नवीन पूल हिमालयला जोडण्यात आल्याने त्यावरचा प्रवासी ताण वाढला आणि ही दुर्घटना घडली, असे देखील अहवालात म्हटले आहे.