मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील कोसळलेल्या हिमालय पूल दुर्घटनेप्रकरणी आज चौथी अटक करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेच्या सेवानिवृत्त मुख्य अभियंता शितला प्रसाद कोरी यांना पोलिसांनी आज अटक केली. महानगर दंडाधिकारी न्यायालयात त्यांना हजर केले असता १० मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
१४ मार्चला मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील हिमालय पूल कोसळून सहाजण ठार झाले. तर ३० पेक्षा जास्त लोक जखमी झाले होते. याप्रकरणी त्याच रात्री आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी सेवानिवृत्त मुख्य अभियंता शितला प्रसाद कोरी यांना अटक केली. महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी पूल दुर्घटनेची तपासणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यामध्ये कोरी यांच्याकडे हिमालय पूलाचा अहवाल आल्यानंतरही त्याने स्वतः पुलाची पाहणी केली नव्हती. शिवाय, सहायक अभियंता एस.एफ. काकुळते आणि अनिल पाटील यांनी दिलेला अहवाल पडताळून पाहिला नव्हता, असा ठपका ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली. तसेच अधिक चौकशीकरिता पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी पोलिसांनी न्यायालयाकडे केली. त्यानुसार न्यायालयाने आरोपीला १० मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस चौकशीत या गुन्ह्यात ३०४/२ कल्पेबल होमिसाईड हा गुन्हा नोंद नव्याने जोडण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, आतापर्यंत हिमालय पूल दुर्घटनेप्रकरणी आझाद मैदान पोलिसांच्या तपासात ३ आरोपींना अटक केली आहे. ऑडीटर नितीन कुमार देसाई याच्यासह सहायक अभियंता एस.एफ. काकुळते, अनिल पाटील यांचा समावेश आहे.